
नागपूर : महसूल व ग्रामविकासाशी संबंधित नागरिकांचे प्रश्न गावपातळीवरच मार्गी लागावेत, या उद्देशाने नागपूर जिल्ह्यात राबविण्यात आलेली ‘नागरिकांशी संवाद’ विशेष मोहीम अत्यंत यशस्वी ठरली आहे. तालुका पातळीवरील सर्व विभागांच्या समन्वयामुळे निर्णय प्रक्रियेला गती मिळाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम ८ ते १३ जानेवारी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आली. सहा दिवसांत अकरा तालुक्यांना सामूहिक भेट देत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी विविध योजनांचा आढावा घेतला.
या काळात पंचायत समिती, तहसील, कृषी व अन्य विभागांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीनंतर नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. शेतकरी व विविध योजनांचे लाभार्थी अशा एकूण ६१० नागरिकांशी संवाद साधताना ५६५ निवेदने प्राप्त झाली. त्यापैकी तब्बल १७२ प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला.
या मोहिमेत जिल्हा प्रशासन, महसूल, कृषी व इतर विभागांतील १,२७९ अधिकारी–कर्मचारी गावपातळीवर प्रत्यक्ष उपस्थित राहिले. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या संयुक्त बैठकीत प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ निर्देश देण्यात आले. घरकूल योजना, झुडपी जंगल प्रस्ताव, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ता योजना, तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, सर्वांसाठी घरे, जमिनीचे स्वामित्व, प्रॉपर्टी कार्ड, ई-फेरफार यांसारख्या कामांना या मोहिमेमुळे गती मिळाली.
“विविध विभागांमधील समन्वयाअभावी नागरिकांच्या तक्रारी वाढतात. हा समन्वय गावपातळीपासून सक्षम करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली असून, स्थानिक पातळीवरच योग्य मार्गदर्शन मिळेल असा विश्वास आहे,” असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.
मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही मोहीम दर तीन महिन्यांनी राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुढील मोहीम ४ ते ११ मार्च दरम्यान होणार असून, विविध तालुक्यांमध्ये ठराविक दिवशी नागरिकांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.








