नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व बडे नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर मतदारसंघाचे उमदेवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले. याचदरम्यान शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बंददाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.
चंद्रशेखर बावनकुळे माझे मित्र आहेत. मी त्यांना सदिच्छा भेट दिली.बावनकुळे विदर्भामध्ये खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील जागा महायुती लढवत आहे. विदर्भातील वातावरण महायुतीमय झाले आणि मोदीमय झाले.महायुतीचे विदर्भातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास वाटतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधकांच्या आरोपांचा महायुतीवर काही परिणाम होणार नाही.महायुती मजबूत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत. ५०-६० वर्षे त्यांनी काही केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी तेच गेल्या १० वर्षांत करून दाखवले. गेल्या ५० ते ६० वर्षांत काय केले, याचा हिशोब काँग्रेसने द्यायला हवा, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच सरकारने केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीत नक्की मिळेल,असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.