नागपूर – उत्तर भारतात श्रावण मास सुरू झाला आहे. उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे पौर्णिमेनंतर श्रावण महिना सुरू करण्याची प्राचीन परंपरा आहे. तर, महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांतील पंचांग पद्धतीप्रमाणे अमावास्येला महिना होण्याची परंपरा आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेनंतर उत्तर भारतात श्रावण मासाची सुरुवात झाली आहे.त्यानुसार हिंदी भाषिकांचा श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे. यापार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः नागपूरसारख्या शहरांमध्येही भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळालं. पहाटेपासूनच शिवमंदिरांमध्ये भक्तांची रांग लागली होती. जलाभिषेक, बेलपत्र अर्पण, दुग्धाभिषेक करत ‘ॐ नमः शिवाय’चा गजर आसमंतात घुमत होता.
श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा भगवान शिवाला अर्पण करण्यात येतो. त्यामुळे आजचा पहिला सोमवार अधिकच मंगलमय वातावरण घेऊन आला. विशेष पूजन, अभिषेक, रुद्राभिषेकाच्या कार्यक्रमांना मंदिरांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागपूरमधील कल्याणेश्वर शिवमंदिर तेलंगखेडी , पुराना शुक्रवारी मंदिर, तथा रामेश्वरी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महिला भगिनींनी पारंपरिक साडी नेसून पूजनात सहभाग घेतला, तर तरुण मंडळींनीदेखील उत्साहाने रुद्राभिषेक केला.
सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. अनेक मंदिरांमध्ये स्वयंसेवकांनी दर्शन रांगा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली. काही मंदिरांमध्ये ऑनलाइन दर्शनाची सोयही करण्यात आली होती.
श्रावणातील सोमवार म्हणजे भक्तांसाठी आध्यात्मिक उन्नतीचा काळ मानला जातो. या महिन्यात उपवास, दानधर्म, व्रत-नियमांचं पालन करत अनेकजण धार्मिक साधनेत गढून जातात.आजचा सोमवार श्रावणात भक्तिरसाची सुरुवात ठरली असून येत्या सोमवारीही अशीच भक्तांची गर्दी पाहायला मिळेल, असा अंदाज आहे.