नागपूर – एका ३४ वर्षीय महिलेची मैत्री करून तिचा विश्वास संपादन करत, आर्थिक फसवणूक व जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी नरखेड येथील उमेश परिहार (वय ३४) याच्यावर सक्करदरा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही धक्कादायक घटना ८ मार्च २०२५ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घडली. पीडित महिला ही हुडकेश्वर परिसरात राहते. सोशल मीडियावरून तिची आरोपी उमेशसोबत ओळख झाली होती. आरोपीने “माझी आई आजारी आहे” असा बनाव करत तिला रोख व ऑनलाईन स्वरूपात एकूण १ लाख ४० हजार रुपये देण्यास भाग पाडले.
नंतर आरोपीने पीडितेला हुडकेश्वर भागात बोलावून तिच्यावर दबाव टाकून जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि तिला सक्करदरा भागातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे बदनामीची भीती दाखवून तिच्यावर बलात्कार केला.महिलेने पैसे परत मागितल्यावर आरोपीने तिला धमकावले व बदनामीची भाषा केली. अखेर पीडितेने हिम्मत दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी उमेश परिहारविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ३७६ (बलात्कार), ३५४(अ) (लैंगिक छळ) व इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.