नवी दिल्ली: शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला. हे पाहता काँग्रेसमध्येही अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणनिती निश्चित करण्यासाठी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे.
काँग्रेस पक्षाध्यक्ष राज्या-राज्यांतील प्रदेश काँग्रेस नेत्यांच्या बैठका घेत असून ११ जुलै रोजी महाराष्ट्रासंदर्भातील महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, माणिकराव ठाकरे असे राज्यातील १५ वरिष्ठ नेते सहभागी होणार आहेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे कमी झाले आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला दिले जावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. यासंदर्भात प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थित चर्चाही झाली असून त्यावर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.