Published On : Fri, Oct 18th, 2019

पाच वर्षात काँग्रेसच्या 15 वर्षापेक्षा दुप्पट कामे भाजपाने केली : मुख्यमंत्री

Advertisement

देशात सर्वात मोठी कर्जमाफी आम्ही केली कन्हान येथे हजारोंच्या उपस्थितीत जाहीरसभा

नागपूर: महाराष्ट्रात काँग्रेसच्या15 वर्षापेक्षा दुप्पट कामे आम्ही पाच वर्षात केली असून काँग्रेसने त्यांच्या कामाचा लेखाजोखा द्यावा आम्ही आमच्या कामाचा हिशेब देतो, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेस-राष्ट्रवादीला कन्हान येथे दिले.

रामटेक भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेला ते संबोधित करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, वासुदेव टेकाम, मल्लिकार्जुन रेड्डी, शरद डोणेकर, विकास तोतडे, अविनाश खळतकर, राधेश्याम हटवार, शरद उईके, संजय मुलमुले, मधुकर उईके आदी उपस्थित होते.

राज्यात भाजपा-शिवसेना व मित्रपक्षांसह महायुतीचे सरकारच येणार असल्याचे विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठी कर्जमाफी आमच्या सरकारने केली. प्रत्येक वेळी शेतकरी अडचणीत सापडला असताना त्याला मदत केली. शेतकर्‍याला मजबूत उभे करण्याचे काम केले. शेवटच्या शेतकर्‍याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी सुरु राहणार असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपुरात कोट्यवधीचा निधी माझ्याकडून आणला, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले- रस्त्यांचे कामे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना 30 हजार किमीचा आराखडा तयार केला. नागपूर जिल्ह्यात 2000 किमीची कामे सुरु आहेत. 18 हजार गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या. 40 लाख लोकांना मोफत उपचारासाठी मदत केली. पालकमंत्री, गडकरी आणि या या जिल्ह्यासाठी केलेले काम कधी विसरता येणार नाही, एवढी कामे आम्ही केली आहेत. तसेच या निवडणुकीत उभ्या असलेल्या बंडखोरांना मते देऊ नका. काँग्रेसला मत देणे आणि बंडखोरांना देणे सारखेच आहे. त्यामुळे भाजपा उमेदवाराच्या नावासमोरील कमळाची बटन दाबा आणि कमळ फुलवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावेळी जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती नागरिकांसमोर ठेवली. त्यात पालकमंत्री पांदन योजना, आरोग्य योजना, सर्वांसाठी घरे, सर्वांसाठी अन्न, शेतकर्‍यांच्या वर्ग 2 ची वर्ग 1 मध्ये केलेली शेतीची प्रकरणे या सर्वांचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणातून करून रामटेकमध्ये कमळाची बटन दाबून प्रचंड मताधिक्याने भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

बावनकुळे आमचा हिरा : मुख्यमंत्री
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी गेली आणि त्यांच्यावर अन्याय झाला असा गैरसमज समाजात पसरवला जात आहे, पण सध्या आहे त्यापेक्षाही मोठे झालेले ते तुम्हाला दिसणार आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला नाही. त्यांना 32 विधानसभेचे प्रचार प्रमुख करण्यात आले आहे. बावनकुळे आमचा हिरा आहे. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे, हे लक्षात घ्यावे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगून गैरसमज पसरविणार्‍यांची तोंडे बंद केली.