नागपूर : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आपण कोरोनाला बळी पडू नये यासाठी सॅनिटायजेशन, मास्क, सेल्फ डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढविणे, ती बळकट करणे यासाठी नियमीत व्यायाम आणि पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. प्रशासन आणि यंत्रणेकडून वारंवार नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र अनेक लोक बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहेत. कोरोनापासून सुरक्षितरित्या काळजी घ्यायची असेल, बचाव करायचा असेल तर समोरच्याला कोरोना आहे हे मानूनच वागा. आपल्यामुळे दुस-यांना कोरोनाची लागण होउ नये, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनावर नियंत्रण आणायचे असेल तर आपले कर्तव्य ओळखा आणि यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन सरस्वती पॅथॉलॉजी लॅबचे संचालक तथा आय.एम.ए.चे उपाध्यक्ष डॉ. दिनेश अग्रवाल आणि कन्सल्टंट फिजिशियन तथा आय.एम.ए.चे कोषाध्यक्ष डॉ. सचिन गाथे यांनी केले.
महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’मध्ये शुक्रवारी (ता.२५) त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी डॉ. दिनेश अग्रवाल आणि डॉ. सचिन गाथे यांनी ‘कोव्हिड काळात घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले व नागरिकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देउन शंकांचे निरसरन केले.
कोव्हिडचा झपाट्याने संसर्ग होतो. एक व्यक्ती १५ ते २० जणांना बाधित करू शकतो. त्यामुळे वारंवार दोन व्यक्तींमध्ये किमान २ मीटरचे अंतर राखण्याचे आवाहन केले जाते. यासोबतच मास्क लावणे अत्यावश्यक आहे. विना मास्कने समोरच्याशी बोलताना कोव्हिडचा धोका सर्वाधिक आहे. एखाद्या ठिकाणी हात लागले आणि तोच हात आपण तोंड, नाक, डोळ्यांना लावला तर कोव्हिडचा संसर्ग होतो, म्हणून वांरवार हात धुण्यास सांगितले जाते. हात धुणे शक्य नसल्यास हँड सॅनिटायजरचा वापर करण्यात यावा. कोरोना हा आजार नागरिकांप्रमाणेच डॉक्टरांसाठीही नवीन आहे. त्यामुळे यावर परिपूर्ण उपाय नाही. यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे, नियमांचे योग्य पालन करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे, असेही डॉ. दिनेश अग्रवाल आणि डॉ. सचिन गाथे म्हणाले.
सध्या कोरोनावरील लसीवर काम सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच सकारात्मक बातमी मिळेल, अशी माहिती यावेळी डॉ. सचिन गाथे यांनी दिली. कोरोनाचे अचूक निदान हे संसर्ग रोखण्याचे मोठे तंत्र आहे. ‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिटमेंट’ ही त्रिसूत्री प्रत्येकाने लक्षात ठेवावी. यामध्ये महत्वाची भूमिका चाचणीची आहे. एखाद्याला कोरोना आहे अथवा नाही याचे निदान चाचणीतूनच होते. समाजात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे आणि ही संख्या सर्वात धोकादायक आहे. लक्षणे नसलेली रुग्ण कोरोनाचे धोकादायक वाहक आहेत.
त्यामुळे थोडीही लक्षणे आढळल्यास किंवा एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्वरीत चाचणी करा. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील सर्वांनीच चाचणीसाठी पुढे यावे. जेवढ्या लवकर चाचणी केली जाईल तेवढ्या लवकर निदान होईल व रुग्णावर उपचार सुरू होईल. आज शहरातील वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणा युद्धस्तरावर काम करत आहे. त्यामुळे नागरिकांनीही यासाठी पुढे यावे. केवळ यंत्रणेमुळेच कोरोना आटोक्यात येणार नाही. यासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखावी. लक्षणे लपवू नका, चाचणी करा, असे आवाहनही डॉ. दिनेश अग्रवाल आणि डॉ. सचिन गाथे यांनी यावेळी केले.