Published On : Wed, Oct 14th, 2020

5 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य वास्तुशास्त्रज्ञाचा गाडा हाकताय प्रभारी

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या प्रकल्पासंबंधित आराखडे, प्रस्ताव तयार करणे आणि वास्तुशास्त्रीय बाबीत सल्ला देणारे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ पद हे मागील 5 वर्षांपासून रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. 5 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य वास्तुशास्त्रज्ञाचा गाडा प्रभारी हाकत आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विविध पदांची माहिती मागितली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनिल गलगली यांस कळविले की दिनांक 16 जून 2005 पासून आजपर्यंत मुख्य वास्तुशास्त्रज्ञ पद रिक्त आहे. मागील 5 वर्षात या पदावर एकूण 6 वेळा मुख्य वास्तुशास्त्रज्ञाचा गाडा प्रभारीने हाकला आहे. या 5 वर्षात 2 वेळा मुख्य अभियंत्यांना मुख्य वास्तुशास्त्रज्ञाचा प्रभार देण्यात आला होता. 2 वेळा उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यांनाही 2 वेळा प्रभार देण्यात आला. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ पद भरावयाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. तांत्रिक पदे भरावयाची जबाबदारी मुख्य वास्तुशास्त्रज्ञ आणि तांत्रिक पदे भरावयाची जबाबदारी ही अधीक्षक अभियंता यांची आहे.

रिक्त पदाचीही संख्या मोठी!
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वास्तुशास्त्रज्ञ विभागात अजूनही रिक्त पदे असून यात 2 वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, 8 वास्तुशास्त्रज्ञ, 13 कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, 5 सहायक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ ही महत्त्वाची पदे रिक्त आहे. याचशिवाय 4 वरिष्ठ लिपिक, 4 कनिष्ठ लिपिक,1 दफ्तरी, 1 लोहमुद्रक आणि 2 शिपाईची पदे रिक्त आहे.


अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांस पत्र पाठवून मुख्य वास्तुशास्त्रज्ञ या महत्वाच्या पदावर कायमस्वरूपी सक्षम आणि योग्य अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. ज्या राज्यात मुख्य वास्तुशास्त्रज्ञ नसेल तर गुणवत्तापूर्ण कामाची हमी कोण देईल? असा सवालही गलगली यांनी शासनाला विचारला आहे.