नागपूर – जंबोदीप नगर परिसरातील अयोध्या नगरमध्ये उघड्या नाल्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले. मागील तीन महिन्यांपासून नाल्यावरील स्लॅबचे काम रखडले असून, तीन प्रमुख रस्ते बंद आहेत. याचबरोबर दोन महिन्यांपासून गटाराचे पाणी थेट नाल्यात मिसळत असल्याने दुर्गंधी आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्यांबाबत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याने भाजपा नेते परशू ठाकूर यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका सौ. रुपाली ठाकूर यांच्या उपस्थितीत नागरिकांनी संतप्त आंदोलन केले. नागरिकांनी झोनमधील अधिकाऱ्यांवर निषेध व्यक्त करत आरोग्य अधिकारी कलोडे यांच्या उद्धट वर्तनाविरोधातही आवाज उठवला.
अधिकारी वर्गावर रोष; काम रखडल्याचा आरोप-
नाल्याचे काम पूर्ण करण्यासाठी मागवलेली पोकलँड मशीन तीन महिन्यांपासून जागेवरच उभी आहे, त्यामुळे एक रस्ता पूर्णतः बंद आहे. दुसऱ्या रस्त्यावर माती टाकून अडथळा निर्माण केला असून, तिसरा रस्ता खोदकामामुळे बंद झाला आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर मोठा परिणाम होत आहे.
आता पुरे झाले; काम सुरू करा किंवा आंदोलन तीव्र करू–
झोनच्या डेप्युटी इंजिनिअर मोखाडे आणि ज्युनिअर इंजिनिअर वाजे यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांचे म्हणणे ऐकले. मात्र, ८ दिवसात काम पूर्ण न झाल्यास आणि २ दिवसांत गटाराचे पाणी थांबवले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
कलोडे यांच्यावर कारवाईची मागणी-
आरोग्य अधिकारी कलोडे नागरिकांशी उद्धटपणे बोलतात, धमकावतात, असा आरोप करत त्यांची झोन मधून बदली करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. या संदर्भात पंत मॅडम, महाले सर आणि आयुक्त कार्यालयात फोनवर तक्रारी केल्या असून, लवकरच आयुक्त साहेबांना लेखी तक्रार दिली जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
अनेक स्थानिक नागरिकांची उपस्थिती-
या आंदोलनात भाजप पदाधिकारी समीर जावदंड, विजय ठवरे, अभिनव जीकार, निलेश घटे, आस्था आमटे, विश्वास वाकेकर, सुनील बन, आशिष नंदनवार, विजय उंबरकर यांच्यासह हटवार काका, दुधाने, निश्चयाने, लांबे, गुप्ता, विनीत इंगेवार, गणेश तायडे, सहारे काका, जिकार काकू, कालमेघ काकू, कोलते काका, पंचभाई, कदम, तिवटणे, बुकावार यांसारखे अनेक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नागरिकांच्या एकजूटीनंतर आता प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.