सोलापूर: अकलूज (ता. माळशिरस) येथील सिया मॅटर्निटी रुग्णालयातील डॉ. तेजस प्रदीप गांधी व डॉ. प्रिया या दांपत्याने बेकायदेशीर गर्भलिंग निदान करून चार महिन्यांत तब्बल ३६ गर्भपात केल्याचे उघडकीस अाले अाहे. गर्भपात केलेल्या एका महिलेच्या माजी सैनिक असलेल्या पतीने हा प्रकार उघडकीस अाणला. या प्रकरणी डाॅक्टर दांपत्याविराेधात कारवाई करण्यात अाली अाहे.
सातारा जिल्ह्यातील विंग (ता. खंडाळा) येथील महिलेला दाेन मुली अाहेत. तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्यानंतर तिने तपासणी केली असता पुन्हा मुलगीच असल्याचे सांगण्यात अाले. त्यामुळे तिने तेव्हा गर्भपात केला हाेता. ९ अाॅगस्ट राेजी २०१७ राेजीही तपासणी केली असता तिला चाैथ्यांदाही मुलगीच असल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले. त्यामुळे सदर महिलेने अकलूजमध्ये गांधी यांच्या रुग्णालयात येऊन गर्भपात करून घेतला हाेता. तसेच हा गर्भ तिच्या गावी विंग येथील नदीपात्रात पुरला हाेता.
दरम्यान, या गर्भपात प्रकरणाची माहिती संबंधित महिलेच्या पतीने अाराेग्य विभागाला दिली. त्यावरून जिल्हा शल्यचिकित्सक व पाेलिस अधीक्षक यांच्या मदतीने हा पुरलेला गर्भ बाहेर काढण्यात अाला. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी व डाॅ. माने यांच्या समितीने अधिक चाैकशी करून गांधी यांच्या अकलूज येथील रुग्णालयात छापा टाकून तेथील साहित्याची तपासणी केली. तेथील रजिस्टरमध्ये ३६ महिलांचा गर्भपात केल्याची नाेंद अाढळून अाली. दरम्यान, पाेलिसांनी डाॅ. तेजस व डाॅ. प्रिया या दाेघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची २८ अाॅगस्टपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी केली अाहे.
जिल्हाभर रॅकेट
पंढरपूर, माळशिरस, इंदापूर, अकलूज, सोलापूर आदी ठिकाणी सोनोग्राफी केल्यानंतर गर्भपातासाठी रुग्णांना अकलूजच्या सिया मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात असल्याचे चाैकशीत समाेर अाले अाहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तेथील डाॅक्टरांचाही शाेध घेऊन त्यांची चाैकशी केली जात अाहे. दरम्यान, डाॅ. गांधी यांच्या रुग्णालयातील साेनाेग्राफी केंद्राची मान्यता रद्द करावी, सातारा जिल्ह्यात धडक माेहीम राबवून बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर, हॉस्पिटलची तपासणी करून त्वरित कारवाई करावी तसेच साताऱ्यातील अटकेत असलेला डॉ. अशोक गुंडू पाटी व सिकंदर शेख यांना सहआरोपी करून अकलूज पोलिसांकडे चाैकशीसाठी द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी केली आहे.
यापूर्वीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता
दहा वर्षांपूर्वी बेकायदा गर्भपात व लिंगनिदान केल्याचा अाराेप ठेवून डॉ. प्रदीप गांधी व डॉ. तेजस गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. न्यायालयाने त्यांना १ वर्षाची कैद व ५ हजार रुपये दंडही ठाेठावला हाेता. मात्र या शिक्षेला डाॅ. गांधी यांनी उच्च न्यायालयात अाव्हान दिले हाेते. तेव्हा तिथे या दाेघांची निर्दाेष सुटका करण्यात अाली हाेती. त्यापैकी डाॅ. तेज हे पुन्हा एकदा याच प्रकरणात अडकले अाहेत.