मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत राज्याच्या विकासास चालना देणारे आणि नागरिकहिताचे एकूण ७ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
नागपूर बुनकर कताई मिलच्या १,१२४ कामगारांना ५० कोटींचं अनुदान-
या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील बुनकर सहकारी कताई मिलमधील १,१२४ कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारकडून या कामगारांना ५० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम कताई मिलची जमीन विकून उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्टार्टअप आणि उद्योजकतेला चालना देणारी नवी धोरण-
मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र स्टार्टअप, उद्यमिता आणि नवोन्मेष धोरण २०२५ ला मंजुरी देण्यात आली. या नव्या धोरणामुळे राज्यातील तरुणांना नवउद्योग सुरू करण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होतील आणि स्टार्टअप इकोसिस्टमला बळ मिळणार आहे.
कुष्ठरोग सेवेसाठी एनजीओंना अधिक अनुदान-
कुष्ठरोग प्रभावित रुग्णांसाठी कार्यरत असलेल्या गैरसरकारी संस्थांना (NGO) दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. याअंतर्गत, या संस्थांना पूर्वी दिल्या जाणाऱ्या २,००० रुपयांऐवजी आता ६,००० रुपये प्रति रुग्ण दराने अनुदान दिले जाणार आहे.
जळगावातील पाचोरा येथे गृहनिर्माणाला गती-
मंत्रिमंडळाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील क्रीडांगणाच्या आरक्षणातून मुक्तता करून ते भूखंड गृहनिर्माण क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे तेथे निवासी प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.