नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीची आढावा बैठक आज (दि. 14 मे रोजी) समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृह येथे पार पडली. बैठकीमध्ये आरोग्य विभागाशी संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान HPV लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. यामध्ये घंटागाडी, शाळा, शिक्षण संस्था, अंगणवाडी, पोस्टर, बॅनर तसेच विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रचार-प्रसार करून निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. HPV लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
तसेच UPHC केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचे नियमित मूल्यांकन करून परफॉर्मन्स रिपोर्ट तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. NUHM अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरती प्रक्रियेला गती देऊन रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग रुग्णांच्या तपासणी, उपचार व पोषण आहार योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच “निक्षय” पोर्टलवर रुग्णांची माहिती वेळेत अपलोड करणे, आधार कार्ड लिंकिंग, फेस व्हेरिफिकेशन व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
आरोग्य समितीच्या बैठकीत सार्वजनिक आरोग्य उपक्रम, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि प्रशासकीय कार्यक्षमतेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी कामावर येताना व जाताना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून इंधन बचतीस हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून जनसेवेसाठी निष्ठेने कार्य करावे, असे निर्देश सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी दिले.
तसेच शहरातील प्रत्येक झोनमध्ये फॉगिंग व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. मनपाच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन समन्वयाने काम करण्याच्या सूचना ही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
याशिवाय, विविध झोनमधील सुमारे 6 हजार सफाई कामगारांच्या आरोग्य तपासणी उपक्रमाचाही आढावा घेण्यात आला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी माहिती देताना सांगितले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांची आरोग्य तपासणी सुरू असून, हा उपक्रम सुरळीतपणे राबविण्यात येत आहे.
आरोग्य सेवा अधिक सक्षम, शिस्तबद्ध व नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी बैठकीत दिले.
या बैठकीला वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती श्रीमती. मनीषा अतकरे, उपसभापती श्री. श्रीकांत आगलावे, सदस्य श्री. प्रमोद ठाकूर, श्री. विक्रम ग्वालबंसी, श्री. योगेश मडावी, श्रीमती. पूजा भुंगावकर, , श्रीमती. रजनी वानखेडे, श्रीमती. भावना लोणारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ मंजुषा मठपती, बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, क्षयरोग अधिकारी डॉ. जिचकार एन,यू.एच.एम.चे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, पी.एच.एन. श्रीमती अर्चना खाडे, श्रीमती दिपाली नागरे, श्रीमती दिपाली गणोरकर, श्रीमती ज्योती मानकर व झोनल अधिकारी उपस्थित होते
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
ASTRO BUZZ | Weekly Talk – Episode 3 | 23–29 August Predictions
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
चीनी की महंगाई पर अनोखा आंदोलन! पेट्रोल पंप पर बांटी चीनी #SugarPrice...
चीनी की जमाखोरी पर प्रशासन का बड़ा एक्शन! #sugarprices #SugarHoarding #MaharashtraNews #newsupdate





