Published On : Thu, Feb 11th, 2021

खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तत्काळ कोव्‍हिड-१९ ची लस द्या

Advertisement

शहरातील विविध मेडिकल संघटनांनी मनपा आयुक्तानां दिले निवेदन

नागपूर : कोरोना काळात दिवस रात्र रूग्णांची सेवा करणारे खासगी रुग्णालयातील डॉक्टर तसेच इतर आरोग्य कर्मचारी आजही कोव्‍हिड-१९ च्या लसीपसून वंचित आहेत. त्यांना तत्काळ कोव्‍हिड-१९ ची लस देण्यात यावी अशी मागणी शहरातील विविध मेडिकल संघटनांनी केली आहे. गुरूवारी (ता. ११) मनपा वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांच्या सोबत शहरातील विविध मेडिकल संघटनांच्या एका शिष्टमंडळाने यासंबंधीचे निवेदन मनपा अयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिले.

निवेदन देतांना संघटन संयोजक वैद्यकीय आघाडीचे डॉ. गिरीश चरडे, आयुर्वेद व्यवसायीक संघटना, भाजपा औषधी विक्रेते आघाडी, राष्ट्रीय एकात्मिक वैद्यकीय संघटना (निमा), पॅरामेडिकल संघटना, मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह, होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडिया, सोहम फाउंडेशन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

मनपा वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा म्हणाले की, नागपूर शहरात कोरोना पासून जवळपास ५० हजार सरकारी आणि खासगी डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता निरंतर सेवा देत आहेत. सोबतच रुग्णालयात सेवा देणारे नर्सींग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, औषध विक्रेता हे सुध्दा सेवा देत आहेत. यांना सुध्दा लवकरात लवकर कोव्‍हिड-१९ ची लस मिळणे गरजेचे आहे. शहरात आतापर्यंत १७ हजार आरोग्य कर्मच्याऱ्यानां लस देण्यात आली आहे.‌ मात्र कोव्‍हिड-१९ च्या लसीसाठी ३९ हजार लोकांनी नोंदणी केली आहे. या उर्वरित नोंदणी केलेल्या लोकांना कॉल अथवा संदेश पोहचवून लस देण्यात यावी. तसेच ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोवीन ॲप वर नोंदणी केली नाही मात्र त्यांना लस घ्यायची आहे अशा लोकांची माहिती गोळा करून त्यांना लस देण्यात यावी. अशा लोकांची यादी सुध्दा यावेळी आयुक्तांना देण्यात आली आहे असेही ते म्हणाले.

सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा लस देण्यात यावी. नोंदणी करूनही काही लोक लस लावून घेत नाही मग अशा वेळेस महागडी लस खराब होते. यावर उपाय म्हणून जे डॉक्टर किंवा मेडिकल स्टाफ लस घेण्यासाठी उत्सुक आहेत अशा लोकांची ‘वेटींग लिस्ट’ तयार करून त्यांना लस देण्याची मागणी यावेळी सर्व संघटनांकडून करण्यात आली, असे वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले.