Published On : Thu, Feb 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा! -पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे एल अँड टी कंपनीला निर्देश

* शासनाकडे हस्तांतरण करा •देखभाल, दुरुस्तीसाठी १० कोटी
Advertisement

मुंबई : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित करावेत, असे सक्त निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिले. दरम्यान, या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री श्री. बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक बोलविली होती. नागपूर शहरात एल अँड टी कंपनीकडून सुमारे ३६०० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील २००० कॅमेरे हे बंद आहेत. यापैकी११०० कॅमेरे हे विविध प्रकारची कामे सुरू असल्याने बंदस्थितीत असल्याचे एल अँड टी कंपनीकडून सांगण्यात आले.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहिती तंत्रज्ञान विषयक टीमने पाहणी करावी

एल अँड टी कंपनीने दुरुस्त करून सुरू केलेले कॅमेरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील माहिती आणि तंत्रज्ञान या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या टीमने याची पाहणी करावी, असेही आदेश मंत्री श्री. बावनकुळे यांनी या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित असणारे नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांना दिले.

गुन्ह्यांचा शोधासाठी कॅमेरे उपयोगी
नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे होईल. चोरी, खून, दरोडा तसेच अपघातातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे उपयोगी ठरणार असून, त्यामुळे बंद असलेले कॅमेरे १५ दिवसांत दुरुस्त करून ते कार्यान्वित करावेत, असे स्पष्ट निर्देश मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची कार्यवाही कशी करायची याच्यादेखील सूचना त्यांनी उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री श्री. आशीष शेलार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. पराग जैन नैनुटिया, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आंचल गोयल आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement