Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Dec 20th, 2018

  नागरिकांच्या मुलभूत सुविधांमधील अडथळे त्वरित दूर करा : महापौर नंदा जिचकार

  महापौर आपल्या दारी : सतरंजीपुरा झोनचा घेतला आढावा

  नागपूर : प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. या सुविधा प्रदान करताना अनेक अडथळे उद्‌भवतात. मात्र नागरिकांच्या सुविधेसाठी मुलभूत सुविधांमध्ये निर्माण होणारे अडथळे तातडीने दूर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

  महापौरांनी नागपूर शहरातील नागरिकांच्या झोननिहाय समस्या जाणून घेण्यासाठी महापौर आपल्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांनी सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक ५, २० व २१ मधील नागरिकांशी भेट घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण भिसीकर, संजय चावरे, संजय महाजन, रमेश पुणेकर, नगरसेविका अभिरूची राजगिरे, शकुंतला पारवे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त विजय हुमने, प्रकाश वराडे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

  बुधवारी महापौरांनी सतरंजीपुरा झोनमधील परिसर, बारसेनगर पाचपावली, शोभाखेत, ठक्करग्राम, इतवारी नगरपुरा, झाडे चौक, शांती नगर, लेंडी तलाव या परिसराला भेटी दिल्या व तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

  बारसेनगर पाचपावली येथील भीम ज्योती बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण अभिवादन करून महापौर नंदा जिचकार यांनी दौऱ्याला सुरूवात केली. बारसेनगर परिसरात नळाला रात्री ९ ते १० या वेळेत पाणी पुरवठा होत असतो. ती वेळ बदलून दिवसाला पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच रात्री परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याने रात्रीला घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी परिसरात पोलिस गस्त लावणे व दादरा पुलावर दोन सीसीटीव्‍ही कॅमेरे लावण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले. बारसेनगर येथील रेल्वे रूळावरील दादरा पूल तुटल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी पादचारी पूल निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

  झोनमधील पाचपावली शोभाखेत येथील कर्मवीर शिंदे उच्च प्राथमिक शाळा मागील पाच वर्षांपासून बंद पडली आहे. शाळेच्या इमारतीचा उपयोग करून नागरिकांच्या सुविधेसाठी करण्याची मागणी यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली. शाळेच्या इमारतीमधील विकास कामासंबंधीचा प्रस्ताव येत्या सोमवारी (ता. २४) होणाऱ्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात सादर करणे. शोभाखेत पाचपावली गोंडपुरा येथील व्‍यायामशाळेच्या परिसरात सौंदर्यीकरण करून या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. परिसरात लालबहादूर शास्त्री उद्यानालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून या ठिकाणी कचऱ्याचीही समस्या आहे. या ठिकाणचे अतिक्रमण काढून कचऱ्याची स्वच्छता करण्यात यावी, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

  ठक्करग्राम येथे सार्वजनिक शौचालय जीर्णावस्थेत असून ते वापरण्यायोग्यही नाहीत. या जागेमध्ये समाजभवन निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली. यासंबंधी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

  इतवारी नगरपुरा येथील दिगंबर जैन परवार ट्रस्टच्या कार्यालयामध्येही महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. यावेळी परिसरातील नागरिकांनी विविध समस्यांचे महापौर नंदा जिचकार यांना निवेदन सादर केले. ट्रस्टच्यावतीने सर्व मान्यवरांचे यावेळी स्वागत करण्यात आले. शांतीनगर तुळशीबाग परिसरातील रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने या ठिकाणी हॉट मिक्स विभागाकडून डांबरीकरणाचा थर देण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. शांतीनगर येथील उद्यानातील विहिरीमधील गाळ काढून काही दिवसांपासून तो तसाच ठेवण्यात आल्याने महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारत गाळ त्वरित हटविण्याचे निर्देश दिले.

  लेंडी तलावामध्ये परिसरातील घाण पाणी सोडण्यात येते. त्यामुळे तलावाची अवस्था अत्यंत बिकट आहे. याशिवाय नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. या तलावामध्ये उतरणारे गडरचे पाणी बंद करून गडरलाईन दुरूस्त करणे तसेच तलावाचे गांधीसागर तलावाच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145