Published On : Fri, May 25th, 2018

लकडगंजमधील मनपाच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने काढा : आयुक्त वीरेंद्र सिंह

NMC's municipal commissioner Inspection

नागपूर: लकडगंज झोन कार्यालयाच्या मागे नागपूर महानगरपालिकेचा भूखंड आहे. हा भूखंड टिंबर मर्चंट असोशिएशनला लीजवर देण्यात आला आहे. मात्र या संपूर्ण जागेवर भटक्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. ते अतिक्रमण तातडीने उठवा आणि संपूर्ण जागेवर सुरक्षा भिंत बांधा, असे निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

आयुक्तांनी शुक्रवारी (ता. २५) सकाळी ८ वाजता लकडगंजमधील संबंधित जागेला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. मनपाच्या मोक्याच्या जागेवर असलेल्या भूखंडावर असलेले अतिक्रमण पाहून आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी चिंता व्यक्त केली. अशा जागांवर अतिक्रमण होण्याची वाट बघू नका. अशा जागांना सुरक्षा भिंतीचे कवच द्या. अतिक्रमण जेथे-जेथे आहे ते तातडीने हटवा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर त्यांनी जुन्या भंडारा मार्गावरील इतवारी रेल्वेस्थानक पुलानजिकच्या मटन मार्केट असलेल्या हरिगंगा इमारतीची पाहणी केली. सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे यांनी आयुक्तांना इमारतीबाबतची माहिती दिली. या इमारतीसंदर्भातही आयुक्तांनी आवश्यक ते निर्देश संबंधितांना दिला. यानंतर पिवळी नदीच्या ज्या भागात स्वच्छता अभियान सुरू आहे, त्या गौतम नगर, समता नगर परिसराला भेट दिली. स्वच्छता अभियानादरम्यान काढण्यात येणारा गाळ भिंतीला रेटून लावा. त्यानंतर तो गाळ टिप्परने इतरत्र हलवा जेणेकरून पाण्यासोबत तो वाहून जाणार नाही, असे निर्देश दिले.

पिवळ्या नदीच्या तीराची मालकी पूर्णपणे नागपूर महानगरपालिकेची आहे. या तीरावरची घाण स्वच्छ करून येथे वृक्षारोपण करा, जेणेकरून भविष्यात अतिक्रमण होणार नाही, असे निर्देश त्यांनी दिले.

यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी लेंडी तलावाची पाहणी केली. या ठिकाणी उपमहापौर दीपराज पार्डीकर हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांनी तलावालगतच्या अतिक्रमणाची माहिती आयुक्तांना दिली. तलावाचे पाणी निघून जाण्यासाठी असलेल्या आऊटलेटवर मोठे अतिक्रमण आहे. त्यामुळे पाणी निघून जाण्याचा मार्ग बंद झाल्याची माहिती उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली. तलाव पूर्णपणे वनस्तींनी व्यापलेला आहे, याबाबत आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. मागील वर्षीही तलावाच्या स्वच्छतेसाठी १५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. परंतु जोपर्यंत तलावावरील अतिक्रमण हटविले जात नाही, तोपर्यंत तलाव स्वच्छ होणार नाही, हे वास्तव पार्डीकर यांनी सांगितले.

लेंडी तलावासंदर्भात तातडीने सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात यावा. अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन तातडीने अतिक्रमण हटविण्यात यावे, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे यांना दिले.

आयुक्तांच्या दौऱ्यात संबंधित ठिकाणचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये सहायक आयुक्त (अतिक्रमण) अशोक पाटील, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे उपस्थित होते.

Advertisement
Advertisement