नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी तीव्र गतीने करा, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापती चेतना टांक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला समितीच्या उपसभापती वंदना यंगटवार, सदस्य सुनील हिरणवार, मंगला खेकरे, स्नेहा निकोसे, मनोज सांगोळे, नरेंद्र वालदे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली. सदर योजनेच्या लाभासाठी ७२ हजार ऑनलाईन तर ८२ हजार ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. ४१,४१८ अर्ज अंतिमरीत्या वैध ठरले आहेत. यातून लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
योजनेचे महत्त्व लक्षात घेता या प्रक्रियेला वेग द्या, असे निर्देश सभापती चेतना टांक यांनी दिले. लाभार्थी यासंदर्भात नगरसेवकांना जाब विचारत असतात. त्यामुळे नगरसेवकांना वेळोवेळी या योजनेसंदर्भातील अद्ययावत माहिती पुरविण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. एसआरए अंतर्गत ४०६४ घरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३५५० घरकुलाचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. उर्वरीत घरकुलाचे वाटप पुढील एक महिन्यात देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.
