Published On : Thu, Sep 28th, 2017

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस येथे आवश्यक सुविधा तात्काळ पूर्ण करा – चंद्रशेखर बावनकुळे


नागपूर:
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी तसेच ड्रॅगन पॅलेस येथे लाखो भाविक उपस्थित राहत असल्यामुळे ड्रॅगन पॅलेस परिसरात पिण्याचे पाणी, दळणवळणाच्या सुविधा, स्वच्छतागृहे तात्काळ सुरु करावे. तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तात्काळ सुरु करावयात, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्या.

कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे धम्मचक्र प्रवर्तना दिनानिमित्त करावयांच्या सुविधांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय मानवता आयोगाच्या सदस्या व माजी मंत्री ॲड सुलेखा कुंभारे, उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भानुसे, कामठीचे मुख्याधिकारी श्री.देसाई, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ड्रॅगन पॅलेस परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहून बृध्द वंदनेत सहभागी होतात. त्यामुळे होणारी गर्दी तसेच वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार नाही. त्यासोबत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या संपूर्ण परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यावर प्राधान्य द्यावे. शहर बस वाहतूक तसेच एसटी महामंडळाची बस वाहतूक सुरळीत चालावी यासाठी घोरपड रोड येथे बसथांब्याची व्यवस्था करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

भाविकांना पिण्याचे शुध्द पाणी पुरविण्यासाठी या परिसरात पाण्याचे स्टॉल उभारावे, तसेच मोठ्या प्रमाणात शौचालय उभारुन भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यावयात. परिसर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने या ठिकाणी कायम स्वच्छता दूत नियुक्त करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी ॲड सुलेखा कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस परिसरात लाखो भाविक भेट देत असल्यामुळे विविध विभागाच्या समन्वयाने आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देताना रस्ते, वीज, पाणी, स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भाविकांना विपशना मेडीटेशन सेंटर याचे सुध्दा आकर्षण आहे त्यामुळे या परिसरातही आवश्यक सुविधा तसेच सुरेक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावयात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे यांनी ड्रॅगन पॅलेस येथे प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या विविध व्यवस्थासंदर्भात बैठकीत माहिती दिली. ड्रॅगन पॅलेस येथे शहर बस वाहतूकीच्या 250 बस फेऱ्या तसेच 175 एसटी महामंडळाच्या बसेसद्वारा भाविकांना दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहणे सूलभ होणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ड्रॅगन पॅलेस परिसरात विविध सुविधांची यावेळी पाहणी केली.


कामठी, महादूला येथील विकास आराखडा प्राधान्याने पूर्ण करा

कामठी, मौदा व महादूला या नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात विविध विकास कामांच्या दृष्टीने शहर विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या तिन्ही शहरांचा डीपी प्लॉन येत्या फेब्रुवारी पूर्वी मंजूर करण्याच्यादृष्टीने आवश्यक नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिल्या.

बिजलीनगर गेस्ट हाऊस येथे कामठी, मौदा व महादूला या शहरातील विकास कामांचा आढावा, तसेच कामठी विधानसभा क्षेत्रातील पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासाचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

महादूला नगरपंचायत क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी उपलब्ध तरतूदीनुसार कामे पूर्ण करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, क्रीडांगण विकास, वाचनालय, ग्रीन जीम आदी कामांना प्राधान्य द्या. कामठी येथे दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध असून ही कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करा. कामठी शहराचा विकास आराखडा 15 फेब्रुवारी पूर्वी अंतीम मंजुरी प्रदान होईल यादृष्टीने नगरविकास विभागाने नियोजन करावे. यावेळी कोराडी विकास आराखडयानुसार कामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार विकास कामे पूर्ण करावीत अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीत दिल्या.