Published On : Mon, Aug 21st, 2017

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित गावात नागरी सुविधांची कामे तात्काळ पूर्ण करा – सचिन कुर्वे

 

·12 पुनर्वसित गावांना भेट देवून प्रत्यक्ष पाहणी
·16 सप्टेंबर पूर्वी पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण करा
·नागरिकांना कुठल्याही अडचणी येणार नाही
·रस्ते, पाणी, वीज आदी कामांना प्राधान्य

नागपूर: गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या ठिकाणी नागरी सुविधांच्या कामासोबत येथील नागरिकांच्या मागणीनुसार रस्ते, पाणी, वीज आदी सुविधा तात्काळ पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पुनर्वसन झालेल्या गावातील नागरी सुविधांच्या कामांची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना दिल्या.

गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत येत असलेल्या पचखेडी, केसोरी, सोनपुरी, बोथली, आंभोरा-अडेगाव येथील पुनर्वसन कामांची पाहणी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केली. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या कुही तालुक्यातील 15 गावांचे पुनर्वसन पाच ठिकाणी करण्यात आले आहे. यामध्ये 1 हजार 775 कुटुंब स्थलांतरीत झाले असून त्यांना 2 हजार 023 भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच भूखंडाचा मोबदला म्हणून 15 कोटी 56 लक्ष रुपये वितरीत करण्यात आले असून पॅकेजअंतर्गत 42 कोटी 43 लाख आणि वाढीव 464 कुटुंबांना 13 कोटी 45 लक्ष रुपयाचे वाटप पूर्ण झाले आहे.

कुही तालुक्यातील 15 गावांचे पाच ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले असून नागरी सुविधांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाअंतर्गत महावितरण कंपनी, जिल्हा परिषद बांधकाम, तसेच पाणी पुरवठा विभागाद्वारे नियोजित करण्यात आलेली सर्व नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहे. येथील नागरिकांच्या मागणीनुसार यंत्रणांनी दखल घेवून तात्काळ प्रश्न सोडवावेत अशी सूचना करताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, महावितरण कंपनीने मागणीनुसार थ्रीफेस कनेक्शन, 16 सप्टेंबर पर्यंत पाणी पुरवठयाची कामे व 31 ऑक्टोबर पर्यंत नागरी सुविधांची कामे पूर्ण करावीत अशी सूचना यावेळी केली.

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पचखेडी एक व दोन येथे पुनर्वसित झालेल्या कुकुडउमरी, सोनेगाव, जिवतापूर, केसोरी येथे पुनर्वसित झालेल्या पवनी, मसली, सिर्सी, बोथली येथे नवेगाव सिर्सी, उमरी, पिंपरीमुंजे, धामणी, गोंडपिंपरी, आंभोरा-अडेगाव येथे आंभोरा कला, अंभोरा खुर्द, मालोदा, गडपायली येथील नागरिकांना भेटून नागरी सुविधांची पाहणी केली व त्यांच्या समस्या ऐकून त्याचे निराकरण केले. पुनर्वसित ठिकाणी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा तसेच वीज वितरण कंपनीतर्फे सुरु असलेल्या नागरी सुविधांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली.