मुंबई – गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा; सर्वपक्षीय आमदारांची मागणी

Advertisement

नागपुर : मुंबई – गोवा महामार्गावरील वडखळ ते इंदापूर दरम्यान चौपदरीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी करत कोकणातील सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेच्या पायऱ्यांवरती आंदोलन केले.

यावेळी या आमदारांनी सांगितले की, मुंबई – गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या ८४ किमी चे काम सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज कंपनीला देण्यात आले होते. झालेल्या करारानुसार हे काम जून २०१४ साली पूर्ण होणार होते. मात्र वेलीची मर्यादा संपल्यानंतरही हे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही.

सद्यपरिस्थितीत वडखळ ते इंदापूर दरम्यान रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली असून, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे सत्र सुरु आहे.

आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष देत असून, कंत्राटदार कंपनीला कुठलाही वचक राहिलेला नाही हे दिसून येत आहे. कंपनीच्या या बेजबाबदारपणाचा फटका मात्र कोकणवासीयांना बसत आहे. रस्त्याच्या डागडुजीला दोन वर्षात ४८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

कोकणातील असंख्य लोक कामकाजाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्याला आहेत. आता काही दिवसानंतर कोकणात गणेशोउत्सवाला सुरुवात होणार आहे.

मुंबईत राहणारे कोकणातील लोक उत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावी जाण्यासाठी नियोजन करत आहे. मात्र रस्तेच खराब असल्याने त्यांना आपल्या गावी जाता येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने या विषयाला गांभीर्याने घेत या महामार्गाच्या चौपदरी करण्याच्या कामाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.