
नागपूर : शहरातील अजनी परिसरात हरवलेल्या चार वर्षीय मुलाचा शोध नागपूर शहर पोलिसांनी अवघ्या एका तासात लावून कुटुंबियांचा जीव भांड्यात पाडला. पोलिसांच्या समन्वयित आणि वेगवान कारवाईमुळे मोठी अनर्थ टळली.
नाईक नगर, प्लॉट क्रमांक ११८ येथे राहणारे राहुल लोखंडे यांनी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता अजनी पोलिस स्टेशन येथे धाव घेत आपल्या चार वर्षीय मुलगा विहान राहुल लोखंडे हा सायंकाळी ५ वाजल्यापासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला माहिती देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. नागपूर पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली अजनी पोलिसांसह बेलतरोडी, हुडकेश्वर, इमामवाडा, नंदनवन आणि सक्करदरा पोलीस ठाण्यांचे पथक तातडीने शोधकार्यात सहभागी झाले.
झोन-४च्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव
तसेच अजनी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त हिवरे यांनी घटनास्थळी भेट देत शोधमोहीमेवर देखरेख ठेवली. पोलिसांनी कुटुंबीयांकडून सविस्तर माहिती घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.
तांत्रिक पडताळणी आणि सातत्यपूर्ण शोधानंतर धक्कादायक पण दिलासादायक बाब समोर आली. मुलगा घरातच असल्याचे लक्षात आले. घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत तो गाढ झोपलेला आढळला. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
शोधमोहीमेदरम्यान स्थानिक नगरसेविका भारती बुंदे यांनीही व्हॉट्सअॅप गटांवर मुलाची माहिती प्रसारित करून सहकार्य केले.
ही संपूर्ण कारवाई पोलिस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांच्या नेतृत्वात पार पडली. पोलिस उपनिरीक्षक सिद्धांत मसके, हेड कॉन्स्टेबल मनोज नेवारे, अविनाश चांगोले तसेच इतर कर्मचारी आणि विविध पोलीस ठाण्यांचे पथक या मोहिमेत सहभागी झाले होते.
नागपूर शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयित प्रयत्नांमुळे चिमुकल्याचा सुरक्षित शोध लागला असून शहरातील आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.








