Published On : Mon, Mar 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गो तस्करीची अवैध वाहतूक उघड; दोन आरोपी ताब्यात

वाहनासह जनावरे जप्त
Advertisement
नागपूर : शहरातील पाचपावली परिसरात गोवंशीय जनावरांची निर्दयतेने व अवैधरीत्या वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पाचपावली पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कारवाई करत सहा जिवंत गोवंशीय जनावरे आणि एक चारचाकी मालवाहू वाहन असा सुमारे ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पाचपावली पोलिसांचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना कडबी चौकाकडून मोतीबाग चौकाच्या दिशेने एका मालवाहू वाहनातून गोवंशीय जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी मोतीबाग चौकातील भोला उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ सापळा रचला.
काही वेळातच संशयित क्रमांकाचे वाहन दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा दिला. मात्र वाहन थांबताच चालक आणि त्याच्यासोबत असलेला दुसरा व्यक्ती वाहन जागेवरच सोडून पळून गेले. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सहा गोवंशीय जनावरे अत्यंत वाईट परिस्थितीत बांधून ठेवलेली आढळून आली. जनावरांना चारा-पाणी न देता निर्दयतेने कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा जिवंत गोवंशीय जनावरे तसेच महेंद्र बोलेरो प्रकारचे मालवाहू वाहन असा एकूण सुमारे ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या जनावरांना पुढील काळजीसाठी गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिस शिपाई राजू सूर्यभान श्रीवास यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ (सुधारित १९९५) तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पुढील तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जनावरांची खरेदी करणारा नवाय अब्दुल कुरैशी (वय ५४, रा. मोमीनपुरा, नागपूर) तसेच वाहन चालक दशरथ सत्तुजी वाघाडकर (वय ३३, रा. मोहपा, ता. कळमेश्वर, जि. नागपूर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत.
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement