मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी २७ महिने तुरंगात बंधिस्त असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी छगन भुजबळांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी बचेंगे तो और भी लड़ेंगे, अशी गर्जना केली असल्याची माहिती पुढे आली आहे.
सुटका झाल्यानंतर समीर भुजबळांनी सिद्धीविनायक आणि अंजिरवाडी गणपतीचं दर्शन घेतलं. मनी लॉण्डरिंग अॅक्टच्या प्रकरणात कमाल सात वर्षांची शिक्षा आहे. समीर भुजबळ यांनी त्यापैकी एक तृतीयांश कालावधी गजाआड काढला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल वांद्रे येथील एमईटी संस्थेत जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. यावेळी राणे आणि भुजबळ यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणे हे पहिल्यांदाच त्यांना भेटले होते. मात्र भुजबळ-राणे यांच्या भेटीमुळं राजकिय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहे. दोघांमध्ये कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती आद्यपपर्यंत मिळू शकलेली नाही.

