
नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP च्या अडचणी वाढणार असल्याचा मोठा दावा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी केला आहे. पक्षातील नेत्यांनी पीस बॉन्डवर स्वाक्षरी करून मोठी चूक केली असून, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे काटजू यांनी म्हटले आहे. अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या निर्णयावरही त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. ‘CJP आता संपली आहे,’ असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत काटजू यांनी पीस बॉन्डच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले. त्यांच्या मते, पीस बॉन्डवर सही केल्यानंतर संबंधित नेत्यांसाठी पुन्हा आंदोलन करणे कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे ठरू शकते. त्यांनी या निर्णयाची तुलना ब्रिटिश राजवटीतील क्रांतिकारकांकडून लिहून घेतल्या जाणाऱ्या माफीनाम्याशी केली.
पीस बॉन्डवर सही अन् आंदोलनाच्या मार्गात अडथळा-
काटजू म्हणाले की, पीस बॉन्डवर स्वाक्षरी केल्यानंतर शांतता राखण्याची हमी दिलेली असते. अशा परिस्थितीत पुन्हा आंदोलन केल्यास बॉन्डच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. परिणामी संबंधित नेत्यांना अधिक काळ तुरुंगात राहावे लागू शकते, असा दावा त्यांनी केला.
यापूर्वी सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना सुमारे आठवडाभर तुरुंगात राहावे लागले होते. मात्र, भविष्यात पुन्हा आंदोलन केल्यास अनेक महिन्यांच्या तुरुंगवासाची वेळ येऊ शकते, असे काटजू यांनी म्हटले आहे. त्यामुळे CJP चे नेते आंदोलन करण्यापासून मागे हटतील आणि संघटनेची ताकद कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
जनतेचा विश्वास गमावला, नेतृत्वाची प्रतिमा खराब झाली-
पीस बॉन्डवर सही करण्याच्या निर्णयामुळे CJP च्या नेत्यांची प्रतिमा जनतेसमोर बदलल्याचा दावा काटजू यांनी केला. ब्रिटिश काळात माफीनामा देणाऱ्या क्रांतिकारकांकडे जनता वेगळ्या नजरेने पाहत असे. त्याचप्रमाणे पीस बॉन्डवर सही करणाऱ्या नेत्यांवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
धर्मेंद्र प्रधान ते ज्ञानेश कुमार; काटजूंचा आंदोलनांवर सवाल-
केवळ व्यक्ती बदलून व्यवस्थेतील प्रश्न सुटत नाहीत, अशी भूमिका काटजू यांनी मांडली. पेपरफुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पेपरफुटीमागील मूळ कारण भ्रष्टाचार असल्याने केवळ मंत्र्यांना हटवून समस्या सुटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. एका व्यक्तीच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती झाली, तर सामान्य नागरिकांचे जीवनमान किती सुधारणार? असा सवाल त्यांनी केला.
काटजूंच्या वक्तव्याने CJP मध्ये खळबळ?
CJP च्या नेत्यांनी घेतलेल्या पीस बॉन्डच्या निर्णयावर मार्कंडेय काटजू यांनी केलेली टीका आता चर्चेचा विषय बनली आहे. एका बाजूला आंदोलनाची भूमिका आणि दुसऱ्या बाजूला पीस बॉन्डमुळे निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी, अशा दुहेरी पेचात संघटना सापडल्याचा दावा काटजू यांनी केला आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर CJP चे नेते काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



