Published On : Tue, Aug 11th, 2020

कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तात्काळ अँटिजेन टेस्ट करुन घ्या -विभागियायुक्त

21 केंद्रांवर कोविड चाचण्यांची सुविधा, खाजगी लॅबमध्ये सुद्धा तपासण्यांना सुरुवात, वेळीच खबरदारी घेतल्यास बरे होण्याचे प्रमाण अधिक

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी प्रशासनातर्फे प्रभावी उपाय केले जात आहेत आणि जनतेकडूनही त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या आजाराचे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास तात्काळ जवळच्या केंद्रावर जावून आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

कोरोनाचे तात्काळ निदान झाल्यास व योग्य उपचार मिळाल्यास मृत्यू सुद्धा सहज टाळणे शक्य आहे. जनतेने सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे आढळून आल्यास जवळच्या केंद्रावर जाऊन आपली कोविड अँटिजेन टेस्ट करुन घ्यावी. शहरातील 21 केंद्रावर ही सुविधा उपलब्ध आहे त्यासोबतच खाजगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये सुद्धा चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अँटिजेन टेस्ट करुन घेतल्यास आपले कुटुंब व निकटवर्तीय यांना त्रास होणार नाही. ही चाचणी सहज उपलब्ध असल्यामुळे न घाबरता या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

कोरोनासंदर्भातील अँटिजेन टेस्ट तसेच आरटीपीसीआर या तपासण्या दररोज 3 हजार पर्यंत करण्याची सुविधा उपलब्ध आहेत. या तपासण्या मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. नागपूर शहरात 44 टक्के तर ग्रामीण भागात 68 टक्केपर्यंत रुग्ण बरे होत आहेत. शहरात कोरोना बाधितांमध्ये मृत्यूदर 3.4 टक्के तर ग्रामीण भागात 1.98 टक्के एवढा आहे. जनतेने कोरोना विषाणूसंदर्भात वेळीच खबरदारी घेवून उपलब्ध सुविधांचा लाभ घेतल्यास जिल्ह्यासह विभागातही कोरोनाबाधितांच्या संख्येत नियंत्रण आणणे सहज शक्य होणार आहे.

कोरोना या आजारासंदर्भात काळजी घेतल्यास आपल्याला हा आजार होणार नाही त्यासाठी तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. अत्यंत महत्त्वाचे असेल तरच बाहेर जा. नियमित साबणाने हात स्वच्छ धुवा. चेहरा, कान, घशाला स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्या. सोशल डिस्टन्सिंगचे सदैव पालन करावे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी शासन व तज्ज्ञांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.