नागपूर : मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मनोज जरांगेंनी पोखरणी, लिमला, परभणी आणि झिरो फाटा या पाच ठिकाणी संवाद बैठका घेतल्या. परभणी संवाद बैठकीत बोलताना मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे.
फडणवीसांनी हिंमत असेल तर आठ दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावे . मग तुम्हाला कळेल की उपोषण म्हणजे काय असतं, हवा कुठून बाहेर जाते आणि कुठून श्वास घेता येतो. वजन कमी करायचं असेल तर या माझ्या बाजूला आणि उपोषण करा. गृहमंत्री म्हणून म्हणालात की आई बहिणींची भाषा मी वापरली. माझा त्यांना सवाल आहे दोन वर्षांच्या मुलीच्या पायात गोळी शिरली होती. ती आई बहीण वाटली नाही? तुम्हाला काय करायचं ते करा मी आरक्षण घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आमच्या आया बहिणींना नीट चालता येत नाही. लाठीचार्जमध्ये त्यांच्या पायांवर डोक्यांवर वार झाले आहेत. तेव्हा आई-बहीण दिसली नाही का? तुमची मराठ्यांविषयीची नियत आम्हाला दिसली.
लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना तुम्ही फक्त दहा दिवसांसाठी निलंबित केले, असाही आरोप मनोज जरांगेंनी केला. माता-भगिनींना आज मी सांगतो, ज्या पोलिसांनी आपल्या माता भगिनींना मारले होते त्यांना देवेंद्र फडणवीसांनी बढती दिली. माता माऊल्यांना मारणाऱ्यांना एसपीला पुण्यात बढती दिली, असेही वक्तव्य मनोज जरांगेंनी केले.
मी मरेपर्यंत माझ्या बांधवांना साथ देणार आहे. तसंच सगेसोयऱ्यांची मागणी सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आपल्याइतका सन्मान कुणीच केला नसेल. त्यांनी ३० दिवस मागायचे आपण ४० दिवस द्यायचे. मात्र सरकारने आरक्षण दिलं का? तर नाही दिले. माझ्या मराठा समाजाची फसवणूक केली,असा घाणाघातही जरांगे पाटील यांनी केला.