Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Sep 5th, 2020

  रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी असल्यास जवळच्या रुग्णालयात दाखल करावे

  महापौर संदीप जोशी यांची सूचना : रुग्णालयांतील

  कोव्हिड संदर्भातील परिस्थितीचा घेतला आढावा

  नागपूर : जास्त लक्षणे असलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. अनेकदा रुग्णालयात गेल्यानंतर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने रुणांना परत पाठविण्याचा प्रकार घडतो. कोरोनाच्या संकटात रुग्णांची ही भटकंती टाळण्यासाठी रुग्णात जास्त लक्षणे आढळल्यास त्याची सविस्तर माहिती त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षाला द्यावी. आवश्यक माहिती घेतल्यानंतर नियंत्रण कक्षाकडून बेडची उपलब्धता लक्षात घेऊन संबंधित रुग्णालयात भरती होण्याचे सुचविले जाते. मात्र प्रत्यक्ष रुग्णालयात गेल्यानंतर आधी रुग्णाची ऑक्सिजनची पातळी तपासली जाते. ती पातळी कमी असल्यास रुग्णाला परत पाठविले जाते. शालिनीताई मेघे आणि लता मंगेशकर रुग्णालय शहरापासून दूर असून शहरातून येथे जाणाऱ्या रुग्णांना सर्वाधिक त्रास होतो. रुग्णालयात जाण्यापूर्वी ऑक्सिमीटरवरून रुग्णाची ऑक्सिजन पातळी तपासावी ती जर ९५ पेक्षा कमी असल्यास शहराबाहेरील वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे किंवा डिगडोह येथील लता मंगेशकर या सारख्या रुग्णालयामध्ये रुग्णास दाखल करणे गैरसोईचे होईल त्यामुळे शक्यतो अशा रुग्णास जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, अशी सूचना महापौर संदीप जोशी यांनी केली.

  कोव्हिड संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता.५) महापौर संदीप जोशी यांनी वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे आणि डिगडोह येथील लता मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी व रुग्णालय प्रशासनाला येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा केली. यावेळी मनपाचे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे अधिष्ठाता डॉ.दिलीप घोडे, डॉ. सौरव, डॉ. सिंग, डॉ. खान, डॉ.ललित जाधव, लता मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक कर्नल धानोरकर, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी मेजर लोकेश उपस्थित होते.

  शालिनीताई मेघे रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांकरिता सध्या १३५ बेडची व्यवस्था आहे. यापैकी १० बेड आयसीयू चे तर व्हेंटिलेटरचे १४ बेड आहेत. एकूण सर्वच १३५ बेडला ऑक्सिजनची व्यवस्था असून बेडची संख्या वाढविण्यास रुग्णालय प्रशासन प्रयत्नशील असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप घोडे यांनी सांगितले. रुग्णालयात सीटी स्कॅन उपकरण नसल्याने अनेक रुग्णांना त्या कारणानेही परत पाठविले जाते. ती व्यवस्था झाल्यास आणखी रुग्णांना सेवा देता येईल, असेही ते म्हणाले.

  लता मंगेशकर रुग्णालयात झालेल्या चर्चेमध्ये रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक कर्नल धानोरकर यांनी या समस्येवर सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले. यासाठी रुग्णांना रुग्णालयाचे निर्धारित शुल्क भरावे लागणार आहे. लता मंगेशकर रुग्णालयात कोव्हिडचे एकूण १९० बेड असून त्यात १० आयसीयू चे तर १० व्हेंटिलेटरचे आहेत. यामध्ये आणखी बेड वाढविण्यात येणार असल्याचे कर्नल धानोरकर यांनी सांगितले. आयसीयूचे बेड वाढविण्यासाठी आवश्यक उपकरणांची पूर्तता करण्याची मागणीही त्यांनी यावेळी महापौरांकडे केली. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले.


  रविवारपासून ‘वॉकर स्ट्रीट’वर ऑक्सिजन तपासणी
  शालिनीताई मेघे रुग्णालयाच्या वतीने उद्या रविवार (ता.५) पासून ‘रामगिरी’ या मुख्यमंत्री निवासस्थानापुढील ‘वॉकर स्ट्रीट’वर ऑक्सिजन तपासणी केली जाणार आहे. कोरोनामध्ये एकदम ऑक्सिजनची पातळी कमी होणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशा स्थितीत सर्वच नागरिकांनी घरात ऑक्सिमीटर ठेवावा. ९५ ते १०० दरम्यान ऑक्सिजन असणे आवश्यक आहे. नागपूरकरांना ही सवय लावण्यासाठी ‘वॉकर स्ट्रीट’वर सहा मिनिटे पायी चालल्यानंतर ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केली जाईल. सहा मिनिटे चालल्यानंतर ९५ ते १०० च्या दरम्यान ऑक्सिजनची पातळी असल्यास सदर व्यक्ती सुदृढ समजली जाईल. अन्य नागरिकांचे वैद्यकीय समुपदेशन केले जाईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप घोडे यांनी सांगितले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145