Published On : Tue, Jan 21st, 2020

संस्थेने मनापासून आव्हान म्हणून काम केले तर स्मारकाचे काम दोन वर्षांत पुर्ण होईल- शरद पवार

Advertisement

मुंबई : -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारकाचे काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर हे काम दोन वर्षांत पुर्ण व्हायला अशक्य नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिलच्या जागेची पाहणी केल्यानंतर मिडियाशी बोलताना मांडले.

स्मारकाच्या जागेवर आतापर्यंत २५ टक्के काम झालं आहे. अजून ७५ टक्के काम बाकी आहे. या स्मारकाचे काम आंतरराष्ट्रीय काम करणारी संस्था आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर हे स्मारक अत्यंत आकर्षक राहणार आहे. जगात मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आहे. अगदी चीनपर्यंत त्यामुळे या स्मारकाचे आकर्षण राहणार आहे. बौद्ध विचारांची आस्था असणार्‍यांना हे स्मारक महत्वाचे असणार आहे.त्यामुळे ज्यांनी घटना दिली त्या महामानवाच्या दर्शनाला जगातील लोक आल्याशिवाय राहणार नाही असेही शरद पवार म्हणाले.

मी काही सूचना केल्या नाहीत. पण मला ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल या दोन तारखा समोर दिसतात. लाखो लोक इथे येतात. सगळा घटक बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भारावून जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले.

दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज केली.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून त्यामध्ये इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचा समावेश आहे.

शरद पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या प्रतिकृतीची आणि त्यानंतर त्यांनी स्मारकाच्या जागेचीही पाहणी केली.

आज शरद पवार यांच्या समवेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार विद्या चव्हाण, आदी उपस्थित होते. याशिवाय मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.