Published On : Tue, Jul 17th, 2018

नाणार प्रकल्पाला सर्वांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: कोकणातील नाणार प्रकल्पाला सर्वांचा विरोध असेल तर हा प्रकल्प लादणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

कोकणातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाबाबतचा तारांकित प्रश्न सदस्य श्रीमती हुस्नबानु खलिफे यांनी विचारला होता. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या प्रश्नासंदर्भात सांगितले, नाणार परिसरातील जनतेला विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. पर्यावरणाचा एक अभ्यास झाला असून दुसरा अभ्यास सुरु आहे. प्रकल्प सुरु करीत असताना पर्यावरणासंदर्भातील सर्व बाबी तपासून पाहण्यात येत आहेत.

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गालाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. परंतु शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनातील शंका दूर केल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला विरोध केला नाही.

लवकरच या महामार्गाचे काम सुरु होईल. त्याचप्रमाणे नाणार प्रकल्पाबाबत तेथील शेतकरी आणि नागरिकांच्या मनातील शंका दूर केल्या जातील. ज्यांनी या परिसरातील जमिनीची खरेदी विक्री केली त्याचीही चौकशी केली जाईल, असेही शेवटी त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री अनिल परब, संजय दत्त, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.