नागपूर : काँग्रेस नेते अविनाश पांडे यांच्या मुलाच्या लग्नासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जून खरगे हे नागपुरात दाखल झाले. यादरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी खरगे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत भाजपवर सडकून टीका केली.
भाजप तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, म्हणून भारत जोडो करीत आहोत, असे खरगे म्हणाले. ओबीसींची जातीय जनगणना हीच राहुल गांधी यांची भूमिका आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास जातीनिहाय जनगणना करू,असेही ते म्हणाले.
नुकतेच निवडणूक आयोगाने मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली. यावर खरगे म्हणाले की, आयोगाची नोटीस आल्यानंतर ठरवू आणि त्याला समोर जाऊ.
नागपूर विमानतळावर खरगे यांचे स्वागत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. सुनील केदार, माजी खा. विजय दर्डा, विलास मुत्तेमवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. राजू पारवे, जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, अनीस अहमद, मुन्ना ओझा, अनंतराव घारड, अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, विशाल मुत्तेमवार,जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, सभापती अवंतिका लेकुरवाळे, रश्मी बर्वे, प्रफुल्ल गुडधे, मुजीब पठाण, गिरीश पांडव, प्रशांत धवड आदी उपस्थित होते.