नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचं कुटुंब जवळपास उद्ध्वस्त झालं आहे. या कारवाईत अझहरच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळचे साथीदार ठार झाले असून, याची स्वतः मसूद अझहरनेही कबुली दिली आहे.
या हल्ल्यानंतर झालेल्या नुकसानामुळे व्यथित झालेल्या मसूद अझहरने म्हटले आहे, या हल्ल्यात माझाही मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं. जैश-ए-मोहम्मदकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे की, मौलाना कशफचा संपूर्ण परिवार, मसूद अझहरची मोठी बहीण, तसेच अब्दुल रऊफच्या नातवंडांवर या हल्ल्यात प्राण गमवण्याची वेळ आली. बाझी सादियाचे पती आणि मोठ्या मुलीची चार मुलं देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
या हवाई हल्ल्यांत मारल्या गेलेल्या कुटुंबातील सदस्यांचं आजच दफनविधी करण्यात येणार असल्याचंही समजतंय.6 ते 7 मेच्या रात्री 1:05 ते 1:30 या वेळेत ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पडलं, अशी माहिती कर्नल सोफिया कुरैशी यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, ही कारवाई 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाममधील निर्दोष नागरिकांवरील अमानुष हल्ल्याचा बदला होती. हल्ल्यात केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं, सैन्य तळ किंवा नागरिकांना कोणतीही हानी पोहोचवली नाही.