Published On : Thu, May 10th, 2018

रेल्वेत चढता-उतरताना अपघात झाल्यास रेल्वेला द्यावी लागणार नुकसान भरपाई


मुंबई: रेल्वे प्रवाशांच्या निष्काळजीपणाचे कारण पुढे करत रेल्वे नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावताना म्हटले आहे कि, रेल्वेत चढता-उतरताना एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर रेल्वेला त्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी लागेल. एका इंग्रजी वृत्तपत्राने ददिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती ए के गोयल आणि न्यायमूर्ती आर एफ नरीमन यांच्या पीठाने, रेल्वेत चढताना किंवा उतरताना एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला किंवा तो जखमी झाला तर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळण्याचा हक्क असल्याचे म्हटले आहे.

रेल्वे अधिनियम 1989 च्या कलम 124 ए नुसार, एखाद्या प्रवाशानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि या घटनेत तो गंभीर जखमी झाला किंवा त्याचा जीव गेला तर अशा प्रसंगी रेल्वेकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असेही न्यायालयोने स्पष्ट केले आहे.

रेल्वे अपघाताच्या घटनांमुळे निर्माण झालेला वाद संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. यानुसार, रेल्वे प्रशासन पीडित प्रवाशांना नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार राहील.