भाजपा कार्यकर्त्यांसाठी विचारधारा आणि संघटनच सर्वोपरी : नितीन गडकरी

Advertisement

नागपूर: स्व. सुमतीताई सुकळीकर आणि त्या काळातील पक्षाचे कार्यकर्ते विचारधारा आणि संघटन सर्वोपरी मानणारे कार्यकर्ते होते. विचारांच्या आधारावर राजकारण ही आमची प्रेरणा आहे. या विचारातूनच सुखी, संपन्न समाज निर्माण होणार आहे. राष्ट्रहित सर्वोपरी हाच विचार घेऊन कार्यकर्त्यांनी पुढे जावे. त्यामुळेच साामजिक, आर्थिक समता निर्माण होईल. लोकशाहीच्या माध्यमातून हे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, अशी भावना उराशी बाळगून काम केले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय सडक परिवहन व लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भाजपा नागपूर महानगरतर्फे आयोजित स्व. सुमतीताई सुकळीकर स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, सुधाताई सोहनी, माजी न्या. मीराताई खडक्कार, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, उपमहापौर मनीषा कोठे, महिला अध्यक्ष किर्तीदा अजमेरा, अर्चना डेहनकर उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले- सुमतीताईंच्या काळातील परिस्थिती अत्यंत कठीण, प्रतिकूल आणि संघर्षाची होती. त्या काळात जनसंघ आणि भाजपाला मान्यता नव्हती. अशा स्थितीतही अनेक कार्यकर्त्यांनी आपले जीवन पक्षासाठी आणि विचारासाठी वाहून टाकले होते.

त्या फळीतील काही कार्यकर्ते आजही आहेत. विरूध्द दिशेला हवा असताना आपला विचार या कार्यकर्त्यांनी जिवंत ठेवला. म्हणूनच त्या काळात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना आपण कधीच विसरू शकत नाही. हा इतिहास एवढ्याचसाठी लक्षात ठेवायचा की, चांगल्या काळात भूतकाळाचा इतिहास विसरलो तर भविष्यातील इतिहास आपण लिहू शकणार नाही. आज आपण पूर्णपणे शक्तिशाली झालो हे पाहण्यासाठी स्व. ताई आपल्यात नाही. विचारधारा आणि संघटन सर्वोपरी मानणारे ते कार्यकर्ते होते. मात्र आज विचारशून्यता ही समस्या झाली आहे. सुमतीताईंसारख्या कार्यकर्त्यांनी जे स्वप्न उराशी बाळगले होते, ते आजही पूर्ण झाले नाही. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठ़ी तो इतिहास आजच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावा तो इतिहासच आमची प्रेरणा आहे असेही गडकरी म्हणाले.

नागरिकत्व कायद्यावरून आज देशात भीती निर्माण केली जात आहे. हा राजकारणाचा भाग आहे. अल्पसंख्यकांच्या मनात भीती निर्माण केली जात आहे, अशा वेळी आपला विचार हा लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सत्ता मिळविणे हा आपला उद्देश नाही तर समाज आणि देश बदलवणे हा आपला उद्देश आहे. ती प्रेरणा ताईंसारख्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला मिळते. ताईंच्या जीवनाकडे पाहिले तर आपल्याला सतत ऊर्जा मिळेल ती देशात सतत प्रज्वलित राहावी म्हणून हा स्मृतिदिनाचा कार्यक्रम असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

याप्रसंगी सुधाताई सोहनी यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला अध्यक्षा किर्तीदा अजमेरा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दिव्या धुरडे यांनी केले.