Published On : Sun, Aug 6th, 2017

विकासाचे मॉडेल ठरले मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले आदर्श गाव फेटरी

 
  • डिजीटल क्लासरुम, विद्यार्थ्यांना टॅब
  • राष्ट्रीय ग्रामीण पेयजलअंतर्गत योजनेचे बळकटीकरण
  • विविध विकास कामांसाठी 4 कोटी 70 लक्ष
  • डिजीटल अंगणवाडी, ग्रीन जीम
  • 33 केव्हीचे सबस्टेशन, बालोद्यान

 

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श ग्राम म्हणून फेटरी या गावात राबविलेल्या पिण्याच्या पाण्यासह सर्वांगीण ग्राम विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करतानाच विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरु केलेल्या डिजीटल क्लासरुमसह डिजीटल अंगणवाडी या योजना आदर्श गावच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरत आहेत.

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मॉडेल ठरावे आणि या विकासाच्या मॉडेलची प्रेरणा इतर गावांनी घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार आदर्श गाव ही संकल्पना राज्यात सुरु केली. नागपूरजवळ असलेल्या फेटरी गावची निवड करुन येथे मुलभूत सुविधांच्या विकासासोबतच ग्रामीण जनतेच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी विविध विभागांच्या योजना एकत्र राबविल्यामुळे फेटरी या गावात पिण्याच्या पाण्यासह आरोग्य, शिक्षण, सामाजिक व आर्थिक विकास, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी सुविधा, दलित वस्ती विकास, बेघरांना घरकुल, तसेच निर्मल ग्रामची संकल्पना एकत्र राबविण्यात आली.

आदर्श ठरलेल्या फेटरी या गावात अत्यंत जुन्या असलेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी रुपये खर्च करुन संपूर्ण गावात पाणी पुरवठा होईल व त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेला अंखडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी सात कोटी रुपये खर्च करुन 33 केव्ही सबस्टेशनचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. त्यासोबतच रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देवून सिमेंट रस्त्यांची कामे त्यासोबतच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिंमेट बंधारे व नाल्यातील गाळ काढण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. शेतीला सिंचनाचे पाणी तर ग्रामस्थांना नियमित स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी महत्त्वकांक्षी योजना या गावात पूर्ण झाली आहे.दलित वस्त्यांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युत तसेच घरोघरी संडास बांधणे उपक्रम ग्रामपंचायतमार्फत राबविल्यामुळे गावाच्या स्वच्छतेसोबतच शंभर टक्के हागणदारीमुक्त झाले आहे. फेटरीच्या सरपंच श्रीमती ज्योती राऊत म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटरी या गावचे आमदार आदर्श गाव म्हणून निवड केल्यापासून सातत्याने विविध योजनांचा लाभ या गावाला मिळत आहे. श्रीमती अमृता फडणवीस यांनी सातत्याने गावात भेटी देवून महिलांच्या आरोग्यासोबतच रस्ते, पाणी, वीज, मुलांना चांगले शिक्षण, तसेच येथील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. गावात योजना राबवत असताना नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाकडे विशेष लक्ष दिले. आंगणवाडीच्या दोन सुसज्ज इमारती, ग्रामपंचायत भवन, सांस्कृती भवन, घनकचर व्यवस्थापन आदी योजना विविध उद्योगांच्या सहकार्य तसेच सामाजिक दायित्व निधी म्हणून उपलब्ध निधी म्हणून पूर्ण झाले आहेत. महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा यशस्वी उपक्रम राबविला आहे.

नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अंगणवाडीच्या परिसरात बालोद्यान, ग्रीन जीम, तसेच वॉकींग ट्रक हे फेटरीचे आकर्षण ठरत असून वृक्षारोपणाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत दोन एकर झुडपी जंगलात एक हजार वृक्ष लावण्यात आले तर स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करुन तेथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलबध झाल्या आहेत. यासाठी 10 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेतीला शासवत सिंचनाचा लाभ देण्यासाठी 19 लाख 52 हजार, लायब्ररीसाठी 25 लाख रुपये, स्मशानभूमीच्या विकासासाठी 10 लाख रुपये, तसेच ग्रामपंचायततर्फे सिंमेट रस्ते, भूमीगत नाली, नवे योजना यावरही या योजनासुध्दा यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.


ग्रामपंचायत भवन इमारती व दोन अंगणवाड्या इमारतीसाठी प्रत्येकी 12 लक्ष रुपये, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या इमारतीसाठी 87 लक्ष रुपये, मलनिस्सारण, जलनिस्सारण या संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत 19 लक्ष रुपये दलित वस्त्यांमध्ये सिमेंट रस्त्यांच्या बांधकामासाठी 13 लक्ष रुपये आदी उपक्रमांची सुरुवात झाली आहे. सामाजिक दायित्व योजनअंतर्गत विविध उद्योगांनी सुमारे 39 लक्ष्‍ा रुपयाचे विकास कामे पूर्ण केली आहेत.


प्रधान मंत्री आवास योजना व रमाई योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी पाच कुटुंबांना 1 लक्ष 20 हजार रुपये देवून हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यात येत असून 22 कुटुंबांना पट्टे वाटप करण्यात आले आहेत. सरासरी साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या नागरिकांना चांगल्या व दर्जेदार नागरी सुविधा देण्यासोबतच स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी आरो मशीन सुध्दा बसविण्यात आले आहे. खासदार निधी तसेच आमदार समिर मेघे यांच्या निधीमधूनही विविध विकास कामे सुरु असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार म्हणून दत्तक घेतलेले फेटरी हे गाव विकासाचे मॉडेल ठरले आहे.