Published On : Wed, Nov 10th, 2021

विधान परिषद निवडणुकीत आदर्श आचारसंहिता पाळण्याचे राजकीय पक्षांना आवाहन

Advertisement

·जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली राजकीय पक्षाची बैठक
·आचारसंहिता लागू ; कडक अंमलबजावणीचे निर्देश
·उद्घाटन, भूमीपूजन, कार्यक्रमावर निर्बंध
· समाज माध्यमांवरही करडी नजर

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 7 जागा एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी रिक्त होत आहे. यामध्ये नागपूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून दयायच्या एका जागेचा समावेश आहे. आज जिल्हाधिकारी विमला आर. यांनी राजकीय पक्षांची बैठक घेऊन आदर्श आचारसंहिता पाळण्याचे आवाहन केले आहे.

या निवडणुकीमध्ये सत्तेचा, शासकीय यंत्रणेचा गैरवापर होणार नाही, कोणत्याही मंत्र्यांच्या बैठकामध्ये शासकीय यंत्रणेचा सहभाग असणार नाही, कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये बैठकी घेता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यावश्यक बैठका देखील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय घेता येणार नाही. कोणत्याही राजकीय घोषणा, शासकीय कार्यक्रमांची घोषणा या काळात करता येणार नाही. खासदार, आमदार, निधीतून नवीन कोणतेही काम करता येणार नाही. प्रचार-प्रसार जाहिराती या संदर्भातील खर्चावर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे नियंत्रण असेल. समाज माध्यंमावर विना परवानगी प्रचार, बल्क एसएमएस सारख्या सेवांना परवानगी नसेल.

ज्या जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूर, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर लगेच आदर्श आचार संहितेची सुरुवात जिल्ह्यात सुरु झाली. त्यामुळे मतदारांना प्रभावित करणाऱ्या कोणत्याही प्रलोभनांना टाळण्याचे आवाहन त्यांनी आज बैठकीमध्ये केले. अन्य निवडणुकां प्रमाणेच या निवडणुकीमध्ये देखील आदर्श आचारसंहिता अस्तित्वात असेल. त्यामुळे कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी सर्व राजकीय पक्षांनी घ्यावी, अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

आजच्या बैठकीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बंडोपंत टेंभुर्णे, प्राध्यापक दिनेश बानाबाकोडे, भाजपाचे रमेश दलाल, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे अमित श्रीवास्तव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रकाश बारोकार, अनंतविजय पात्रीकर, बसपाच्या विजयकुमार डहाट, संदीप मेश्राम यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मीनल बनकर आदी उपस्थित होते.