
File Pic
नागपूर : आयसीआयसीआय बँकेच्या बनावट सोन्याच्या तारणावर तब्बल २३ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन राऊत याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून विविध शाखांमधून कर्ज मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
नागपूर शहरातील आयसीआयसीआय बँकेच्या नऊ शाखांमध्ये बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून मोठ्या प्रमाणात गोल्ड लोन घेण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या गैरव्यवहारातून बँकेला सुमारे २३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
बनावट ग्राहकांचे जाळे उभे केल्याचा आरोप-
तपासानुसार, सचिन राऊतने विविध व्यक्तींच्या नावाने गोल्ड लोन मिळवून देण्यासाठी यंत्रणा उभी केल्याचा आरोप आहे. बँकेतील काही अधिकारी, सोन्याचे मूल्यांकन करणारे अधिकारी आणि तपासणीशी संबंधित व्यक्तींच्या संगनमतातून बनावट दागिन्यांना खरे सोने असल्याचे दाखवून कर्ज मंजूर करण्यात आल्याचा संशय आहे.
या प्रकरणात बनावट सोन्याच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या मोठ्या संख्येने खातेधारकांची भूमिका तपासली जात आहे. तपासात नऊ शाखांमधील मोठ्या प्रमाणातील गोल्ड लोन खाती संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत.
ऑडिटमधून उघडकीस आला घोटाळा-
मनिषनगर शाखेतील गोल्ड लोन खात्यांच्या अंतर्गत तपासणीदरम्यान काही तारण दागिने बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकेने इतर शाखांमधील गोल्ड लोन खात्यांची तपासणी केली. या व्यापक तपासणीत बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतल्याचे अनेक प्रकार समोर आले.
या प्रकरणात यापूर्वी बँक व्यवस्थापक, सोन्याचे मूल्यांकन करणारे अधिकारी आणि तपासणी अधिकाऱ्यांसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपासाचा विस्तार करत आता मुख्य आरोपी सचिन राऊतला अटक केली आहे.
आर्थिक व्यवहारांचा मागोवा-
आर्थिक गुन्हे शाखेकडून कर्जाची रक्कम कोणत्या खात्यांमध्ये जमा झाली, त्यानंतर ती रक्कम कुठे वळवण्यात आली आणि या व्यवहारांचा आरोपींशी काय संबंध आहे, याचा तपास केला जात आहे. तसेच बँक कागदपत्रे, कर्ज अर्ज, सोन्याचे मूल्यांकन अहवाल, खाते व्यवहार आणि इतर पुराव्यांची छाननी सुरू आहे.
या प्रकरणात आणखी आरोपी आणि बँकेतील संबंधित व्यक्तींची भूमिका समोर येण्याची शक्यता असून, संपूर्ण आर्थिक जाळ्याचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.



