Published On : Fri, Jul 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बँकांना गंडा;पीतळावर सोन्याचा मुलामा, कोट्यवधींचा गोल्ड लोन घोटाळा!

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रात उघडकीस आलेला आयसीआयसीआय बँकेतील गोल्ड लोन घोटाळा हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या फसवणुकीच्या नव्या स्वरूपाकडे बोट दाखवणारा प्रकार असल्याची चर्चा आहे. पूर्वी काही सराफा व्यापारी, मध्यस्थ आणि कथित गोल्ड व्हॅल्युअर्स यांच्या संगनमताने गोल्ड फायनान्स कंपन्यांची फसवणूक केली जात होती. आता त्याच पद्धतीचा वापर खासगी बँकांमध्ये झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) तपासात आतापर्यंत सुमारे २७ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या संशयास्पद गोल्ड लोन व्यवहारांचा तपास सुरू आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,400 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,33,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणात ईओडब्ल्यूने आणखी दोन शाखा व्यवस्थापकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आशीष बैजू वंजारी (४५) आणि प्रकाश त्रिभुवन अवस्थी (३५) यांचा समावेश आहे. यापूर्वी तत्कालीन शाखा व्यवस्थापक पंकज केकतपुरे, गोल्ड व्हॅल्युअर नंदू खरवाडे, ऑडिटर राजेंद्र शिलंकर आणि प्रमोद टेटे यांना अटक करण्यात आली होती.

पीतळावर सोन्याचा मुलामा, बँकांची कोट्यवधींची फसवणूक-
तपासातील माहितीनुसार, पीतळ किंवा इतर धातूपासून तयार केलेल्या दागिन्यांवर सोन्याचा जाड मुलामा चढवून ते खरे सोन्याचे दागिने असल्याचे भासवले जात होते. त्यानंतर त्या दागिन्यांवर कोट्यवधी रुपयांचे गोल्ड लोन मंजूर करून घेतले जात होते. अशीच पद्धत पूर्वी काही गोल्ड फायनान्स कंपन्यांमध्येही वापरण्यात आली होती.

Advertisement

कमी व्याजदराचा गैरफायदा-
खासगी सावकार किंवा सराफा व्यापाऱ्यांच्या तुलनेत बँका आणि गोल्ड फायनान्स कंपन्या कमी व्याजदरात आणि जलद कर्ज देतात. याच व्यवस्थेचा गैरफायदा घेत, बनावट ग्राहक, गोल्ड व्हॅल्युअर आणि काही बँक अधिकाऱ्यांच्या कथित संगनमतातून बनावट दागिन्यांवर लाखो रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचा संशय आहे.

ऑडिटमध्ये उघड झाला घोटाळा-
ग्राहकाने कर्जाची परतफेड न केल्यावर किंवा नियमित ऑडिटदरम्यान तारणातील दागिन्यांची पुन्हा तपासणी केली जाते. त्यावेळी संबंधित दागिने खरे सोने नसून बनावट असल्याचे उघड झाले. मनीषनगर शाखेतील ऑडिटमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर इतर शाखांचाही तपास सुरू करण्यात आला.

१५९ संशयास्पद गोल्ड लोन खात्यांची चौकशी-
जानेवारी २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५९ संशयास्पद गोल्ड लोन खाती मंजूर झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर बँकेच्या आणखी नऊ शाखांची चौकशी सुरू करण्यात आली असून, सुमारे दहा माजी शाखा व्यवस्थापकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे.

फक्त शाखा व्यवस्थापकच जबाबदार?
इतक्या मोठ्या प्रमाणावर गोल्ड लोन मंजूर करताना ग्राहकाची ओळख, सोन्याची शुद्धता, मूल्यांकन, कागदपत्रांची पडताळणी आणि अंतिम मंजुरी अशा अनेक टप्प्यांत प्रक्रिया पार पडते. त्यामुळे हा घोटाळा केवळ काही अधिकाऱ्यांपुरता मर्यादित आहे की यामागे मोठे संगनमत आहे, याचा तपास सुरू आहे.

तपासातून आणखी मोठे धागेदोरे मिळण्याची शक्यता-
आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू असून, इतर शाखा किंवा इतर बँकांमध्येही अशाच प्रकारे बनावट गोल्ड लोन मंजूर झाले आहेत का, याची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण रॅकेटमधील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डीसीपी दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संतोष टोकलवार आणि त्यांची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची भूमिका समोर येण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.

रविकांत कांबले

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.