मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मोठा राजकीय भुकंप करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अजितदादा लवकरच भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करणार अशा उलट -सुलट चर्चा सुरु होत्या. पण आता अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधून या सर्व बातम्या फेटाळल्या आहेत.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार, असे विधान पवारांनी केले. माझ्यासोबत जे आमदार बाहेर पडणार असल्याच्या बातम्या होत्या त्यामध्ये देखील काही तथ्य नाही आम्ही सर्व जण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत आहोत, असे अजित पवार म्हणाले. इतकेच नाही तर तत्पूर्वी अजित पवार यांनी एक ट्विटही केले आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असे पवार ट्विटमध्ये म्हणाले आहेत.