नागपूर :भाजपने फोडाफोडीचे आणि सुडाचे राजकारण केले. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला, अनेकांना जेलमध्ये टाकले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात बोलताना केली. यावेळी राऊत यांनी अप्रत्यपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मैत्री तोडल्याचा आरोप केला. यासंदर्भात प्रसार माध्यमांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. संजय राऊत काय बोलले, काय म्हणाले? हे मला माहित नाही. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मी माझं मत व्यक्त करावे? मी काही रिकामटेकडा नाही. ते रिकामटेकडे असल्याने रोजच बोलतात,असा घणाघात फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरे सेनेने महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आता संपुष्टात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. महाविकास आघाडी तुटेल की कायम राहील याकडे आमचे लक्ष नाही. आम्हाला काही फरकही पडत नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल व मेयो या दोन रुग्णालयाला भेट दिली. दोन्ही रुग्णालयाच्या इमारतींना दशक झाले आहे. त्यामुळे या इमारती अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. दोन्ही ठिकाणी कामाची प्रगती पाहण्यासाठी मी आलो आहो. दोन्ही इमारतीचे कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र गती वाढवण्याची आवश्यकता आहे. काही त्रुटी आढळल्या. त्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. काम दर्जेदार झाले पाहिजे अशी अपेक्षा आहे. एप्रिल महिन्यामध्ये मी पुन्हा आढावा घेणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिली.