मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. फडणवीस म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये शिंदे आणि माझ्या नाराजीच्या चर्चा सुरु आहेत. मात्र यात काही तथ्य नाही. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या प्रकल्पाला स्थगिती दिली. आता ही एक पेड बातमी झाली आहे. पण हे लक्षात ठेवा की, स्थगिती देण्यासाठी मी उद्धव ठाकरे नाही.
यापूर्वी देखील मी स्पष्ट केले आहे की, जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरु करताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी देखील होतो आणि त्यानंतर दादा देखील होते. त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहे, त्याची जबाबदारी एकट्या शिंदेंची नाही आहे तर आम्हा तिघांची आहे. असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, ज्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी आढळल्या, खालच्या स्तरावर गडबड होत असते.
त्या त्या ठिकाणी चर्चा करुनच स्थगिती देण्यात येते पण विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तर लगेच देवेंद्र फडणवीसांचा दणका तर खाताच्या मंत्र्यानं स्वत;च्या खात्यामध्ये केंद्र सरकारच्या सुचनेनुसार स्थगिती दिली तरी देखील शिंदेंच्या खात्यात फडणवीसांनी स्थगिती दिली. अशा बातम्या माध्यमांत येत असल्याचे फडणवीस म्हणाले.
हे सरकार समन्वयाने चालणारे सरकार आहे. या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिथे समन्वयानं घेतो, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना म्हणाले. तसेच जर बैठकीत दोघांपैकी एक हजर नसेल तर तो नाराज अश्या बातम्या चालत आहे. कॉलिटीच्या बातम्या माध्यामांना सापडत नाही आणि विरोधकांना देखील कॉलिटीची टिका करता येत नाही,असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.