नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव जाहीर झाले नव्हते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना महविकास आघडीत येण्याची ऑफर दिली होती. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगल्या होत्या.
दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, असे उध्दव ठाकरे म्हणाले होते. त्यावर आता नितीन गडकरींची प्रतिक्रिया आली आहे.
राजकारणात वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोक देत असतात. हे चालतच राहणार आहे. ते आपण विनोदानं घ्यायला हवं. माझी भाजपाशी कटिबद्धता आहे.
त्यामुळे मी दुसऱ्या पक्षात जाण्याचं कारण नाही. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आहोत. फक्त आमच्या विचारांत भिन्नता आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. संघाचा स्वयंसेवक आहे. त्यामुळे माझा पक्ष, माझा विचार आणि संघटन हे मला सर्वोपरी आहे. त्यामुळे हा पक्ष सोडून दुसरीकडे कुठे उभं राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
ज्यांनी या सदिच्छा दिल्या, त्यांना धन्यवाद. पण मी असा कोणताही प्रयत्न कधी करणार नाही. माझ्या सिद्धांताशी तडजोड करणार नाही, असेही गडकरी म्हणाले.