Published On : Thu, Feb 16th, 2017

संशयाच्या भुताने केला घात

Advertisement


नागपुर:
समाजात असलेले अशिक्षितपणा व दारूचे व्यसन किती वाईट थराला जाऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोनेगाव पो स्टे हद्दीत आदिवासी कॉलनी मध्ये पत्नीनेच आपल्या पतिचा केलेला निर्घृण खून यावरून दिसून येते. वास्तविक पत्नी सौ राणी गेडाम हिचे वय 44 वर्ष होते. तिचे तिलक गेडाम सोबत लग्न होउन चांगली 25 वर्ष झालेली होती. 20 वर्षाच्या वरची दोन मुले या दाम्पत्याला होती. पति व पत्नी दोघेही काम करुन, मेहनत करुन आपली उपजीविका करीत असत. मुळचे शिवनी जिल्ह्याचे असलेले कामाच्या शोधात दहा वर्षापुर्वी नागपुर शहरात दाखल झाले. शहर असल्याने त्यांना लगेच काम ही मिळाले.पती हा नळ फिटिंग च्या कामात गुंगला तर पत्नी सौ.राणी भांडे घासने,झाडू मारण्याचे काम घरोघरी जाऊन करु लागली. दोघानाही चांगली पैश्याची आवक येत होती. येथेच माशी शिंकली. त्यांना दोघानाही दारू पिण्याची वाईट सवय लागली. या दारू पिण्यामुळे यापूर्वी कित्येक परिवार उध्वस्त झालेले अनेकानी पाहिले आहेत. परंतु अशिक्षितपणा व योग्य समज नसल्याने हे व्यसनच आपल्या मुळावर उठणार आहे, आपल्या मागासलेपणाला हे दारुचे व्यसनच कारणीभूत आहे हे काही अश्या व्यक्तीना समजत नाही. त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबावर किती अनर्थ कोसळेल याची कल्पना या बिचाऱ्या पामराना येत नाही व आपले आयुष्य गमावुन बसतात. आता स्त्रीला बाहेर काम करायचे म्हणजे चार घरी जाणे, पुरुषांना बोलणे या बाबी अपरिहार्य आहेत.

पुरुषानीही ही बाब समजून घेणे आवश्यक आहे. परंतु पाशवी पुरुषी विचार मात्र हे मानायला तयार नसतात. स्त्री ही कमावती असावी,तिने मेहनत करावी असे पुरुषांना वाटते पण त्यासोबच तिचे समाजात मुक्त वागणे मात्र पुरुष अद्याप ही स्विकारु शकला नाही हेच या खुनावरुन समजून येते.’ तू त्या बंगल्यावर काम करतेस,तुला नवीन साडी घेऊन दिली म्हणजे तुझे त्या बंगलेवाल्या सोबत काहीतरी लफडे आहेच ‘असे सारखे पालूपद हे पती लावत असतात. पत्नी जर खरोखर तशी नसेल तरी तिला हे पतीचे टोमने नाहक ऐकावे लागतात. कधी-कधी तर चारचौघात सुद्धा असे बोलण्यास पती मागेपुढ़े पाहात नाहीत. पोटात दारू गेली की आपण आपल्या पत्नी ला काय बोलतोय याचे ही भान राहत नाही.पत्नी ही दारू पित असेल तर मग पाहायचे कामच नाही.

PI Sanjay Pandey

यातील मृतक तिलक मडावी हा तर रोजच दारू पित असे. लग्न होऊन 25 वर्ष झालीत, आता मुलांची लग्न व्हायची वेळ आली तरी संशयाचे भूत व दारुचे व्यसन काही कमी होत नव्हते. आरोपी सौ राणी ही मासाहारी जेवण असले की दारू पिण्यास मागेपुढ़े पहात नसे.पुरुषाने दारू पीनेच मुळात वाईट तेथे स्त्री ही दारू पित असेल तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी. नेहमीप्रमाणे घटनेच्या दिवशी मृतक दारु पिऊनच घरात आला.अंडाभुर्जी बनविली होती. आल्यापासुनच मृतक तिलक ने सौ राणी ला तुझे काय लफडे आहे सांग असा तगादा लावून भांडण करू लागला. मुलगा कृष्णा ने मध्यस्थी करुन कसेबसे भांडण सोडविले व तो बाहेर निघुन गेला. आता सर्व शांत झाले होते. पण सौ राणी च्या मनात मात्र अघोरी विचार थैमान घालत होते. मृतक तिलक तर खुप दारू प्यालेला होताच. तिने आतुन दार बंद केले व तिलक झोपलेला असतानाच त्याच्या डोक्यावर बाजुलाच असलेल्या पतीच्या हातोडीने डोक्यावर चार घाव मारले. घाव इतके जोरात होते की तिलक प्रतिकार करू शकला नाही. दवाखान्यात पोचताच उपचार करतानाच तिलक ची प्राणज्योत मालविली.

पति ने पत्नी ला अथवा पत्नी ने पति ला मारणे हे गुन्हे समाजात वाढ़णे हे समाजाला भुषणावह निश्चितच नाही. देवाच्या साक्षीने ज्याच्या सोबत सुखाने राहण्याची शपथ घेतली जाते त्या जोड़ीदारानेच खून करावा हे घोर कृत्यच म्हणायला हवे. विश्वास कोणावर ठेवावा हा प्रश्न येथे निर्माण होतो.फक्त खून म्हणून याकडे बघुन भागणार नाही तर यातुन समाजाने काहीतरी शिकायला हवे. विनाकारण संशय घेणे टाळायला हवे. दारू चे व्यसन तर लगेच सोडून देणे हाच यावर एकमेव उपाय आहे. दारू मुळे आपली विचारशक्ति नष्ट होते. पति-पत्नी चे पटतच नसेल तर काडी मोड घेणे,वेगळे राहणे,संशय दूर करणे,आपल्या जोडीदाराला आवडत नसेल तर तसे न वागणे असे उपाय सहज करता येतात.यातील एखादा ही उपाय या घटनेत केला असता तर निश्चितच मृतक तिलकचा जीव वाचला असता. आपल्या घरात अवजार,चाकू इत्यादी सहज हाती लागेल अश्या ठिकाणी ठेऊ नयेत असे ही या घटनेवरुण सांगावे वाटते. तात्कालिक रागावर आरोपी महिलेने जर नियंत्रण ठेवले असते तर तिला आज तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती. एकंदरीत दारुचे व्यसन व संशयाचे भूत कसे आयुष्य उध्वस्त करते,संसार उघडयावर आणते हेच या घटनेने दाखवून दिले आहे. बाप देवाघरी तर आई तुरुंगात अशी विचित्र अवस्था बिचाऱ्या दोन्ही मूलावर आलेली आहे. अश्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी कृपया समाजाने यातुन बोध घ्यावा असे आवाहन नागपुर शहर पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.