नागपूर : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल.
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून कालपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर काल देवेंद्र फडणवीसांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. याचदरम्यान एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार की हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यास देवेंद्र फडणवीसांना प्रति महिना किती पगार मिळणार? याची सध्या चर्चा सुरु झाली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन वेळोवेळी सुधारित केले जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आता 3.4 लाख रुपये प्रति महिना झाले आहे. यापूर्वी 2016 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन दरमहा 2.25 लाख रुपये होते. मुख्यमंत्र्यांना घर, गाडी, वीज, फोन, प्रवास अशा सुविधा मिळतात. त्यांना सर्वाधिक सुरक्षा मिळते. तथापि, या सुविधा राज्यानुसार बदल जात असतात. राज्य विधिमंडळाने मुख्यमंत्र्यांसाठी पगारासह अनेक भत्ते निश्चित केले आहेत.यामध्ये महागाई तसेच इतर अनेक भत्त्यांचा समावेश आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांना निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आदी मोफत मिळतात.
‘या’ मुख्यमंत्र्यांचा पगार सर्वाधिक –
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक दरमहा 4.10 लाख रुपये दिले जातात. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 3.90 लाख रुपये, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 3.65 लाख रुपये, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 3.35 लाख रुपये, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना 3.21 लाख रुपये, हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना 3.10 लाख रुपये देण्यात आले आहेत.