Published On : Sat, Jun 3rd, 2023

नागपुरात सत्ता टिकवण्यासाठी भाजपने मुस्लिम लीगशी केली होती हातमिळवणी तर आता विरोध का ?

Advertisement

नागपूर : मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या पक्षात गैरधर्मनिरपेक्ष असे काही नाही,’ असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. गांधी यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मात्र दुसरीकडे नागपुरात २०१२ च्या महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजप नेते नितीन गडकरी यांनी अल्पसंख्याकवाद’बाबत संघ परिवाराची ठाम भूमिका धुळीस मिळवत सत्ता टिकवण्यासाठी मुस्लिम लीगशी हातमिळवणी केली होती. तर भाजपकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा विरोध का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

देशाच्या फाळणीसाठी कारणीभूत ठरलेला आणि इसिसच्या पावलांवर पाऊल ठेवणारा मुस्लिम लिग हा पक्ष धर्मनिरपेक्ष कसा होऊ शकतो ? असा संतप्त सवाल उपस्थित करत भाजपने राहुल गांधींना घेरले. राहुल गांधी यांनी आधी अभ्यास करावा, विचार न करता बोलू नये,असे भाजप नेत्यांनी त्यांना खडेबोल सुनावले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर युतीचा एक भाग म्हणून इशरत अन्सारी आणि मुस्लिम लीगचे अस्लम खान नागपूर विकास आघाडीमध्ये सामील झाले. नागपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रथमच एक मुस्लिम महिला जैतुन बी या भाजपच्या तिकिटवर निवडून आल्या होत्या.

मुस्लिम लीगसोबतच्या युतीसंदर्भात आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावेळी आपले मत मांडले होते. मला वाटते की मुस्लिम मतदारांमध्ये गडकरींच्या चांगल्या प्रतिमेमुळेच आम्हाला मते मिळाली. मुस्लीम लीगच्या नगरसेवकांनी गेल्या नागरी मंडळातही भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिला होता. नागपूर-मध्य आणि नागपूर-पश्चिम या शहरातील दोन विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मते निर्णायक ठरू शकतात, असे फडणवीस म्हणाले होते. हे पाहाता मुस्लिम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे , या राहुल गांधींच्या विधानाला भाजपकडून विरोध होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान इंडियन युनियन मुस्लिम लीग’ (आययूएमएल) या पक्षासोबत केरळमध्ये काँग्रेसची आघाडी असून, त्याचे समर्थन राहुल यांनी केले. आगामी तीन-चार विधानसभा भाजपला काँग्रेसकडून पराभव स्वीकारावा लागेल, असा दावा राहुल गांधींनी केला होता.