- निर्मल अर्पाटमेंट धंतोलीच्या रहिवाशांनी स्वखर्चानेच लावल्या कचऱ्यापेट्या
- मनपा व मैत्री परिवाराचा कचरा विलगीकरणाचा शुभारंभ
नागपूर: सोसायटीच्या माध्यमातून स्वच्छतेचे अभियान जास्त प्रभावीपणे राबविता येते. प्रत्येक घरातून कचरा निर्माण होत असतो आणि प्रत्येक माणूस कचऱ्याचा निर्माता असतो. निर्मिती स्थळावरच ओला व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करुन तो हिरव्या व निळ्या रंगाच्या कचरापेटीत टाकणे यात गृहिणींची भूमिका ही महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले.
नागपूर महानगरपालिका व मैत्री परिवारातर्फे बुधवारी सकाळी ८ वाजता धंतोलीतील निर्मल अर्पाटमेंट येथील स्वच्छता अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एखाद्या स्वयंसेवी संस्थेतर्फे पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्वच्छतेचे अभियान सोसायटीच्या पातळीवर राबविणारा हा शहरातील पहिलाच उपक्रम आहे. याप्रसंगी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रम्हास्थानंद, कृष्णमूर्ती महाराज, मैत्री परिवाराचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, अरविंद गिरी, मकरंद पांढरीपांडे, राजीव जैसवाल, मोहन देशपांडे, विजय जेथे, विरेंद्र वैद्य, मोहन गंधे, दिलीप ठाकरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आयुक्त श्री. मुदगल म्हणाले, डॉ.आंबेडकरांनी देशाला जी घटना दिली त्यातच नागरिकांच्या अधिकारांसोबतच नागरिकांची कर्तव्येही समाविष्ट केली आहेत. आपला परिसर, आपले शहर, आपला देश सुंदर व स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक व संवैधानिक कर्तव्यच आहे.
महात्मा गांधी यांनी आयुष्यभर सेवादलाच्या माध्यमातून स्वच्छतेची कास धरली होती. या देशाचा नागरिक दुसऱ्या देशात स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळतो; मात्र आपल्याच देशात स्वच्छतेचे नियम ते पाळत नाही. स्वच्छतेअभावी निर्माण होणारे प्रदूषण हे प्रत्येकासाठीच घातक असते. त्यामुळे घराघरापासून स्वच्छता हा जीवनाचा एक नियमच बनवून घ्या, असे आवाहन आयुक्त अश्विन मुदगल यांनी या प्रसंगी केले.
सोसायटींनी मोठ्या प्रमाणात यात पुढाकार घेतल्यास १ युनीट वीज ते स्वत: निर्माण करु शकतात. कचरा ही संपत्ती निर्माण करणारे घटक आहे हे आता तरी नागरिकांच्या मनात बिंबवले पाहिजे. स्वच्छता ही सवय झाली पाहिजे असे सांगून मैत्री परिवाराचा हा उपक्रम ही लहान सुरवात असली तरी समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. ही एक महत्त्वाची सुरवात असून एक दिवस स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराला कोणाच्याही मागे लागण्याची गरज उरणार नाही.
स्वामी ब्रम्हास्थनंद यांनी यावेळी मंगलोर शहराचे उदाहरण सांगताना स्वच्छतेच्या बाबतीत या शहराचा उल्लेख केंद्र शासनाच्या गॅझेटमध्ये आला असल्याची माहिती दिली. विविध सोसायटींच्या माध्यमातून मंगलोर शहरात होणारी नियमित स्वच्छतेची प्रशंसा स्वत: केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी केली. प्रास्ताविक संजय भेंडे यांनी केले. आभार प्रमोद पेंडके यांनी मानले. यावेळी मीरा जथे, मृणाल पाठक, मंजुषा पांढरीपांडे, जुही पांढरीपांडे, अर्पणा गंधे, वासंती वैद्य, अंजली जोशी, सुरेखा देशपांडे आदींची उपस्थिती होती.
