Published On : Thu, Apr 15th, 2021

रुग्णालयांकडे आता स्वत:चा ऑक्सीजन प्लांट असावा : ना. गडकरी

Advertisement

‘एनसीआय’मध्ये कोविड सेंटरचे उद्घाटन
100 बेडची सेवा सुरु
20 आयसीयू, 30 व्हेंटीलेटर्सचे बेड उपलब्ध होणार
भिलाईवरून होणार 400 टन ऑक्सीजनचा पुरवठा

नागपूर: आगामी काळ हा कठीण आहे. कोविडचे संकट किती दिवस चालणार हे आज सांगता येणार नाही. ही परिस्थिती पाहता मोठ्या रुग्णालयांनी स्वत:चा ऑक्सीजन प्लांट सुरु करावा म्हणजे रुग्णांची गैरसोय होणार नाही व ऑक्सीजनसाठी अन्यत्र भटकण्याची आवश्यकता पडणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कोविडच्या रुग्णांसाठी कोविड सेंटरचे उद्घाटन आज ना. गडकरी यांच्याहस्ते झाले. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी एनसीआयचे सीईओ शैलेश जोगळेकर, डॉ. आनंद पाठक व्यासपीठावर उपस्थित होते. या
रुग्णालयात सुरुवातीला 20 आयसीयू व 30 व्हेंटीलेटर असलेले बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे.

येत्या आठ दिवसात आणखी 100 बेडची व्यवस्था केली जाणार आहे. कॅन्सर रुग्णांसाठी असलेल्या सुविधेव्यतिरिक्त फक्त कोविड रुग्णांसाठी 200 बेडची व्यवस्था या केंद्रात केली जाईल, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- कोविड रुग्णांसाठी ऑक्सीजनचा तुटवडा आहे. भिलाईवरून ऑक्सीजनची
व्यवस्था झाली असून 400 टन ऑक्सीजनचा पुरवठा होणार आहे. 300 बेड मेडिकल-मेयोमध्ये वाढविण्यात येत आहेत. तेथे विशाखापट्टणम येथून ऑक्सीजन पुरवठा होईल. रुग्णांसाठी 1000 व्हेंटीलेटर मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रेमडेसीवीर इंजेक्शनबद्दल बोलताना ना. गडकरी म्हणाले- ज्या 4 कंपन्या हे औषध निर्माण करीत होत्या. आता केंद्र शासनाने आणखी 7 कंपन्यांना औषध बनविण्याची परवानगी दिली आहे. यासाठी आपण स्वत: पंतप्रधान आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना भेटलो व ही परवानगी मिळविली. येत्या 3-4 दिवसात या इंजेक्शन तुटवड्याचा प्रश्न सुटेल. 200 बेड कोविड रुग्णासाठी नव्याने उपलब्ध होत असल्यामुळे कोविड रुग्णांना दिलासा मिळेल. तसेच मेडिकल, मेयो येथे ऑक्सीजन प्लांट सुरु होणार आहे. एनसीआयनेही युध्दस्तरावर ऑक्सीजन प्लांट सुरू करण्याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस दुसर्‍या लाटेत नागपुरात मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण आढळले असून बेड, औषध, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ना. गडकरी यांच्या नेतृत्वात आम्ही तात्काळ कोविडच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले- 60 बेड उद्यापासून सुरु होतील. पुढच्या 8 दिवसात 200 बेड सुरु होतील.

यातील 20 बेड आयसीयूचे तर 30 बेड व्हेंटिलेटरसह असतील. याशिवाय एनसीआयच्या 2 सीटी स्कॅन मशीन कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहेत. एनसीआयची रचनाच गरिबांची सेवा करण्यासाठी आहे. अतिशय चांगली डॉक्टरांची चमू येथे काम करीत आहे. ना.गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे ऑक्सीजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनची अडचणही सुटणार आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

एनसीआयचे सीईओ शैलेश जोगळेकर यांनी सुरुवातीला हॉस्पिटलबद्दलची माहिती देऊन कोविडग्रस्तांच्या मदतीसाठी शक्य त्या सवलती उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. या कार्यक्रमांला महापौर दयाशंकर तिवारी, खा. विकास महात्मे, आ. परिणय फुके, आ. प्रवीण दटके उपस्थित होते.