नागपूर : शहरातील वर्धा रोडवर पुन्हा एकदा रफ्तारचा कहर बघायला मिळाला आहे. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (८ जून) उशिरा रात्री BMW कारने दिलेल्या जबर टक्करमुळे २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, चालक अपघातानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मृत युवकाचे नाव योगेश बोपचे (वय २५) असे असून, तो एका नातेवाइकासोबत एम्स रुग्णालयात टिफिन देऊन परतत असताना ही दुर्घटना घडली. रात्री सुमारे ३.१५ वाजता चिचभवन परिसरात मागून भरधाव वेगात आलेल्या HP 89 A 1592 क्रमांकाच्या BMW कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अवस्थेत योगेश आणि त्याचा नातेवाईक यांना तातडीने एम्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले, तर त्याचा नातेवाईक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
बेलतरोडी पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे. परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
वर्धा रोड बनत आहे ‘मृत्यू महामार्ग’?
वर्धा रोडवरील अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही. सतत होणाऱ्या दुर्घटनांमुळे नागपूरच्या वाहतूक सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या भागात ट्राफिक पोलीसांची उपस्थिती आणि वेग मर्यादा याबाबत अनेकदा उदासीनता दिसून आली आहे.
हा आरोपी लवकरात लवकर पोलिसांच्या तावडीत सापडतो का, की हा प्रकारही अनेक अपघातांप्रमाणे फाईलमध्येच गढूळून जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.