नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेबूरडोहजवळ मंगळवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता भरधाव अज्ञात वाहनाने ॲक्टिव्हाला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ॲक्टिव्हा क्रमांक MH 40 DM 7843 चारगावच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. या अपघातात सर्रा, सावनेर येथील आशीष पांडुरंग अंबाडरे (२७) आणि मध्य प्रदेशातील तायगाव खैरी येथील आकाश शांताराम कोहडे (३२) हे दोघे गंभीर जखमी झाले. आशीषची प्रकृती चिंताजनक असून आकाशच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी खापा पोलिसांना कळविले. त्यानंतर हितज्योती आधार फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेतून दोघांनाही सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच खापाचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड आणि पोलीस हवालदार प्रकाश नांदूरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, धडक देऊन पळून गेलेल्या वाहनाचा आणि चालकाचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




