नागपूर – शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. काही तरुणांनी रस्त्याच्या कडेला उघडपणे हुक्का आणि दारू पार्टी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकारामुळे नागपूर पोलिसांच्या गस्त व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, एक पांढऱ्या रंगाची कार रस्त्याच्या कडेला येऊन थांबते आणि त्यातून काही युवक खाली उतरतात. त्यानंतर काही वेळातच दुचाकीवरून आणखी काही युवक तिथे पोहोचतात आणि लगेचच रस्त्याच्या कडेला जणू काही ‘हुक्का पार्लर’ व ‘दारू पार्टी’ सुरू होते.
स्थानिक नागरिकांच्या मते, ही घटना रात्री उशिराची आहे. मोठ्या आवाजात गोंधळ, शिवीगाळ होत असल्याने अनेकांनी आपल्या घराच्या खिडक्या आणि बाल्कनीतून बाहेर डोकावले. जे दृश्य त्यांनी पाहिले ते अत्यंत धक्कादायक होते. काहींनी ही संपूर्ण घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आणि तीच क्लिप आता सोशल मीडियावर वेगाने प्रसारित होत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या दक्षतेवर आणि गस्त व्यवस्थेवर टीका होऊ लागली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जर शहराच्या मुख्य भागात अशा घटना घडत असतील आणि पोलिसांना त्याची कल्पनाही नसेल, तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित कसे राहणार?
सध्या पोलिसांकडून या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार व्हिडीओची चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपी तरुणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून मागणी केली जात आहे की, अशा घटनांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही.