Published On : Thu, Oct 6th, 2022
By Nagpur Today Nagpur News

आदिवासी विकास विभागाकडून कर्तबगार महिलांचा गौरव

Advertisement

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम

नागपूर : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला एक आगळावेगळा आदिशक्ती सन्मान सोहळा आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित केला होता. वनामती येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी-कर्मचारी महिलांनीच सांभाळली आणि हा सोहळा यशस्वी केला, हेही या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य. या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष तथा आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनीही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एखाद्या महिलेनेच स्वीकारावे असे सुचवले. ती जबाबदारी त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना ठाकरे यांनी पार पाडली. माजी महापौर मायाताई इवनाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा झाला.

पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या महिला, उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणी, राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या क्रीडापटू, गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी काम करणाऱ्या समाजसेविका यांच्यासह राजकारण, समाजकारण क्षेत्रातील आदिवासी महिला प्रतिनिधींचा यावेळी गौरव करण्यात आला.

शांताबाई कुमरे, अंबिका बंजार, डॉ. उज्ज्वला आत्राम, मनीषा कुलसंगे, अर्चना नाहमुर्ते, वंदना उईके, कांचन पंधरे, मीनल नैताम, शीलाबाई उईके, सुनिता उईके, नेहा उईके, पुष्पा नाईक, फुलवंता बागडेहरिया, लीलाताई आत्राम, वीणा चिमूरकर, जयश्री लटाये, डॉ. शारदा येरमे, कल्पना गावडे, गायत्री कुमरे, कुसुमताई आलाम, रितू कोवे, शालिनी कुमरे, श्रीमती मरसकोल्हे, माधवी धुर्वे आणि प्रभाताई पेंदाम, रंजना मसराम, मनीषा उईके, अनिता पेंदाम, कला वाढवे, सारिका गौतम आदी आरोग्य, प्रशासन, शिक्षण, सामाजिक कार्य, साहित्य, राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश होता.

सत्कार स्वीकारल्यानंतर प्रत्येक सत्कारमूर्ती आपापल्या क्षेत्रातील अनुभव, संघर्ष याविषयी माहिती देत होत्या. त्यामुळे एकाच मंचावरून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आदिवासी महिलांचा जीवनप्रवास जाणून घेण्याची संधी कार्यक्रमाला उपस्थित महिला, विद्यार्थिनींना मिळाली.

आदिवासी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून यामुळे महिलांना नवी ऊर्जा मिळेल. तसेच या महिलांना एकाच मंचावर आणून त्यांचे अनुभव, संघर्ष जाणून घेण्याची संधी आदिवासी विकास विभागाने उपलब्ध करून दिली आहे. त्यातून प्रेरणा घेऊन इतर महिलांनीही विविध क्षेत्रात पुढे यावे. तसेच आपल्या समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन श्रीमती इवनाते यांनी यावेळी केले.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित आदिशक्ती सन्मान सोहळा प्रेरणादायी असून या महिलांचे अनुभव सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतील. आदिवासी विकास विभागामार्फत उपलब्ध शिक्षण सुविधा, विविध योजनांचा लाभ घेवून समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. नोकरी हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करावा, असे श्रीमती ठाकरे यांनी सांगितले.

श्रीमती गिरी, प्रा. टेकाम, श्रीमती किलनाके, श्रीमती मरसकोल्हे, शांताबाई कुमारे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच प्रभाताई पेंदाम यांनी गौंडी गीत सादर केले.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सहआयुक्त बबिता गिरी, सेवानिवृत्त प्राध्यापिका सुमित्रा टेकाम, वर्धा येथील रत्नाबाई विद्यालयाच्या शिक्षिका रेखाताई जुगनाके, दूरदर्शनच्या सहाय्यक अभियंता संध्या किलनाके, कौशल्या कुमरे, जयश्री गावरान, श्रीमती शेराम, तसेच आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपायुक्त दशरथ कुळमेथे यावेळी उपस्थित होते.

प्रास्ताविकात गिरीजा उईके यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. अंजली पालटकर व आरती दांदळे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीमती मटी यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement